'कोरोना कवच' विमा योजना, 447 रुपयांपासून सुरुवात By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 06:57 PM 2020-07-20T18:57:11+5:30 2020-07-20T19:08:08+5:30
जगभरात कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संपर्ण जग कोरोनाची देवा प्रमाणे वाट बघत आहे. मात्र, अद्याप कोरोनावर कुठलिही लस आली नाही.
देशात कोरोनाबाधित रुग्णांचा बरे होण्याचा दर वाढला असून 7,00,087 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, अद्यापही कोरोनाची भीती नागरिकांमध्ये दिसून येते.
कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे.
तर सहा लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 11 लाखांच्या वर गेला आहे.
देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 11 लाख 18 हजार 43 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 27,497 वर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनापूर्वी वैद्यकीय विमा संरक्षणासाठी काही कंपन्यानी फायदेशीर प्लॅन बाजारात आणले आहेत.
कोरोना कवच आरोग्य विमा योजना मार्केटमध्ये येताच ग्राहकांच्या पसंतीची बनली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 जुलैपासून विमा कंपन्यांकडून कोरोनाची विमा पॉलिसी बाजारात आली आहे.
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावात माफक दरात नागरिकांना उपचार मिळावेत, हाच उद्देश असल्याचं कंपनीकडून सांगण्यात येतंय.
कोरोना कवच ही विमा योजना आपल्या स्वत:साठी, पत्नी, आई-वडिलांसाठी आणि 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी खरेदी करता येऊ शकते. सध्या, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील नागरिकांनी या विमा पॉलिसीला अधिकतम पसंती दिली आहे.
केवळ 447 रुपयांत या विमा पॉलिसीची खरेदी करता येते, त्यामध्ये 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच ग्राहकांना मिळते.
या विमा पॉलिसीचा कालावधी 3.5 महिने ते 9.5 महिन्यांपर्यत असणार आहे, घरी घेतलेल्या उपचारासाठीही खर्चही या पॉलिसीअंतर्गत मिळणार आहे.
सरकारी केंद्राच्या ठिकाणी कोविड 19 पॉझिटीव्ह असलेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे, तसेच, या आजारासह इतर रोग आणि रुग्णवाहिकेचा खर्चही ग्राहकांना क्लेम करता येईल.
447 रुपयांपासून ते 5630 रुपयांपर्यंत हा प्रिमियम असल्याचे बजाज अलियान्सने सांगितले, त्यामध्ये रुग्णालयातील दैनंदीन रोख स्वरुपातील खर्चही ग्राहकांना मिळणार आहे.
35 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना 50 हजार रुपयांचं विमा कवच 447 रुपयांत (जीएसटी वेगळा) मिळणार आहे. तर, 31 ते 55 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना 2.5 लाख रुपयांचे कव्हर 2200 रुपयांत मिळेल. जर दोन पौढ आणि एक लहान मुलाचा विमा कवच घेतल्यास, 4700 रुपयांना ही पॉलिसी मिळेल.
आयसीआयसीआय लोम्बार्डनेही कोरोना कवच आरोग्य विमा योजना सुरु केली आहे, जी 50 हजार रुपयांपासून ते 5 लाखांपर्यंतचं कवच देत आहे.