Corona Updates: कोरोना रुग्णसंख्या कमी होतेय, पण मृत्यूंच्या संख्येत होतेय वाढ; या मागचं कारण काय? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 04:11 PM 2021-05-20T16:11:17+5:30 2021-05-20T16:24:02+5:30
Corona Updates In India: कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात नुसता धुमाकूळ घातला. पण गेल्या काही दिवसांमध्ये देशातील रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत घट होताना दिसत नाहीय. कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्या वाढीच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. पण मृत्यूंची संख्या मात्र काही कमी होताना दिसत नाहीय. रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूंच्या संख्येत वाढ होण्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत तज्ज्ञांनी काय मत मांडलं ते जाणून घेऊयात...
भारतात कोरोना महामारीचा दुसऱ्या लाटेचा उच्चांकी आकडा ६ मे रोजी पाहायला मिळाला. या दिवशी देशात ४ लाख १६ हजार नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यानंतर रुग्णसंख्येत हळूहळू घट होताना पाहायला मिळाली.
याच आठवड्यात दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा २ लाख ६५ हजारांपर्यंत खाली आला आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत असली तरी मृत्यूंच्या प्रमाणात काही घट होताना दिसत नाहीय.
भारतात १८ एप्रिल रोजी १६२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर १८ मे रोजी मृत्यूंचा आकडा ४५०० च्याही वर पोहोचला आहे. तर २० मे रोजी पुन्हा एकदा मृत्यूंचा आकडा ४ हजाराच्या खाली आला आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार भारतात कोरोना रुग्णवाढीवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांना यश मिळत असलं तरी मृत्यूंच्या प्रमाणात होणारी घट दिसून येण्यासाठी पुढचे १५ दिवस तरी लागतील. कारण आता रुग्णसंख्या कमी होत असली तरी एका कोरोना रुग्णाला बरं होण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो.
कोरोनाची लागण झाल्याच्या १५ दिवसांमध्येच रुग्णाची परिस्थिती गंभीर झाल्यास मृत्यूचा धोका वाढत असतो. त्यामुळे दिवसागणिक वाढणारे रुग्ण जरी आता कमी होताना दिसत असले तरी मृत्यूंचं कमी झालेलं प्रमाण आपल्याला येत्या काही दिवसात नक्कीच दिसून येईल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
भारतात कोणत्याही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद जाहीर करण्यामागची प्रक्रिया देखील खूप मोठी आहे. चाचण्यांचा आकडा थेट लॅबमधून स्थानिक प्रशासनाकडे येतो मग तो राज्य सरकारी आणि केंद्र पातळीवर पाठविण्यात येतो. पण मृत्यूंचा आकडा नोंद करण्याची पद्धत वेगळी आहे.
कोणत्याही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर सुरुवातीला संबंधित रुग्णालयाकडून कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात येतं. त्यानंतर स्थानिक प्रशासनाकडे याबाबतची माहिती जाते. त्यानंतर राज्य सरकार पातळीवर याची नोंद केली जाते आणि यात काही राज्यांचे आकडे समोर येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी देखील लागतो.
महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली या ठिकाणी सध्याच्या मृत्यूंच्या आकड्यांसोबतच काही जुने आकडे देखील नंतर जोडले जातात. पण यात केवळ भारतच नव्हे, तर इतर देशांमध्येही हाच ट्रेंड पाहायला मिळतो. मृत्यूंची पडताळणी आणि नोंद होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेळ लागतो.