Corona Lockdown : 'गड्या आपला गावच बरा', लॉकडाऊनमुळे पुन्हा परतीचा प्रवास सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 04:41 PM 2021-04-13T16:41:57+5:30 2021-04-13T17:15:55+5:30
लॉकडाऊनच्या भीतीने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली या राज्यांमधून मजूर आपल्या गावी परताना दिसत आहेत. त्यामुळेच, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवरही गर्दी पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 1 लाख 61 हजार 736 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 879 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतातील 16 राज्यांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात, महाराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या 24 तासांत समोर आलेल्या रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या सर्वाधिक आहे. एवढेच नाही, तर याच तीन राज्यांत सक्रिय रुग्णांची संख्याही सर्वाधिक आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी लॉकडाऊन व त्याचा फटका बसणार असलेल्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चा केली.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच, पुन्हा मजूरांचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचं दिसून येत आहे.
लॉकडाऊनच्या भीतीने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली या राज्यांमधून मजूर आपल्या गावी परताना दिसत आहेत. त्यामुळेच, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवरही गर्दी पाहायला मिळत आहे.
दिल्ली, मुंबई, सुरत, भोपाळ यांसह अनेक ठिकाणचे छायाचित्र समोर आले आहेत. या छायाचित्रातून कामगार वर्ग गावच्या प्रवासाकडे डोळे लावून बसलेला दिसतोय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकेडवारीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 1 कोटी 36 लाख 89 हजार 453 वर पोहोचली आहे.
यांपैकी 1 लाख 71 हजार 58 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही वाढून 12 लाख 64 हजार 698 वर पोहोचली आहे. एकूण संक्रमितांचा विचार करता ही संख्या 9.24% एवढी आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढवून ती अधिकाधिक लोकांना मिळेल याची व्यवस्था करणे, रेशन दुकानांतून तांदूळ, गव्हासोबतच डाळी, साखर, तेलाचाही पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे.
दारिद्र्यरेषेवरील व्यक्तींना ८ रुपये किलो गहू आणि १२ रुपये किलो दरावर तांदूळ देण्याची नोव्हेंबरपासून बंद झालेली योजना पुन्हा सुरू करण्याचाही विचार आहे.
भाजपा नेत्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला असून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनीही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.