CoronaVirus News: कोरोना रुग्ण रात्रभर ऑक्सिजनसाठी तडफडला; सकाळी गळफास लावलेल्या स्थितीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 04:11 PM2021-04-19T16:11:30+5:302021-04-19T16:14:23+5:30

CoronaVirus News: रात्रभर ऑक्सिजन लावा म्हणणाऱ्या रुग्णाची आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदा दिवसभरात १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. त्यानंतर गेल्या २४ तासांत देशात पावणे तीन लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्र आणि दिल्ली पाठोपाठ आता गुजरात, राजस्थान, झारखंड, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमध्येदेखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे.

झारखंडच्या एका रुग्णालयात एका कोरोना रुग्णानं ऑक्सिजन न मिळाल्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

झारखंडच्या गढवा येथील रुग्णालयात रविवारी रात्री उशिरा एका कोरोना रुग्णानं गळफास घेतला. हा रुग्ण रात्रभर ऑक्सिजनसाठी तडफडत होता, अशी माहिती अन्य रुग्णांनी दिली.

मला ऑक्सिजन लावा, अशी विनंती रुग्णाकडून रात्रभर केली जात होती. अनेकांनी त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. मात्र रुग्णालयातील कर्मचारी त्याच्या मदतीला आले नाहीत.

गढवा जिल्ह्यातल्या कांडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या करकटा गावातील एका तरुणाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याला गढवा जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं.

सोमवारी सकाळी तरुणाचा मृतदेह रुग्णालयाच्या व्हरांड्यात लोखंडी ग्रीलला गमछ्यानं लटकलेल्या स्थितीत आढळून आला. रुग्णाच्या मृत्यूची माहिती कर्मचाऱ्यांना सकाळीच समजली. त्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ माजली.

एका कोरोना रुग्णानं ऑक्सिजनअभावी आत्महत्या केल्यानं आता इतर कोरोना रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.