Corona Vaccination: कोरोनाच्या एका डोसामुळे ९२ टक्के होतो बचाव; केंद्र सरकारची महत्वाची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 01:03 PM 2021-07-03T13:03:39+5:30 2021-07-03T13:13:33+5:30
Corona Vaccination: जगात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा कहर वाढू लागला आहे. हा विषाणू वेगाने पसरू लागला असून जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू ९६ देशांत पसरल्याचे सांगितले आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने कमी होत असला तरी सरकारचे म्हणणे असे की, १६ राज्यातील ७१ जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे. या जिल्ह्यात संक्रमणाचा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या आठवड्यापर्यंत चिंताजनक स्थितीच्या महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आता धोकादायक स्थितीच्या जिल्ह्याच्या यादीत नाहीत.
जगात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा कहर वाढू लागला आहे. हा विषाणू वेगाने पसरू लागला असून जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू ९६ देशांत पसरल्याचे सांगितले आहे. येत्या महिन्यांत कोरोनाचे हे नवे रूप जगासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हा विषाणू पहिल्यांदा भारतात सापडला होता. मंगळवारपर्यंत हा डेल्टा व्हेरिअंट ९६ देशांमध्ये सापडला आहे.
तिसरी लाट येणे न येणे हे आमच्या हाती आहे. जर आम्ही शिस्त पाळली, दृढनिश्चय केला तर ती लाट येणार नाही. डेल्टा प्लसच्या संक्रमणाबद्दलही नीती आयोगाचे सदस्य पॉल म्हणाले की, त्याचे रुग्ण १२ राज्यात मर्यादित असून रुग्ण संख्या वाढून ५६ झाली आहे, असे डॉ. पॉल म्हणाले.
डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला आहे. देशात केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणाची मोहिम राबवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाची मोहिम जागतिक स्तरावर चालवली जात आहे.
सध्या भारतात दररोज सुमारे ५० लाख नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र कोरोना लसीकरणाबाबत लोकांच्या मनात अजूनही अनेक शंका आहेत, ज्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. या लसीच्या दोन्ही डोसमुळे या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ९८ टक्क्यांनी कमी होते, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात इतरही अनेक लस स्थापित केल्या जात आहेत, ज्यांच्या दोन डोसची तज्ज्ञांनी शिफारस केली आहे. यावर केलेल्या अभ्यासाच्या आधारे सरकारने असं म्हटले आहे की, लसीच्या दोन्ही डोसमुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची शक्यता कमी होते. दोन्ही लसीच्या डोसमुळे मृत्यूची शक्यता ९८ टक्क्यांनी कमी होते तर एका डोसमधून सुमारे ९२ टक्के बचाव होतो.
दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासांत ४४ हजार १११ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२ वर पोहचली आहे. देशात सध्या ४ लाख ९५ हजार ५३३ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ५७ हजार ४७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.