Corona Vaccine: गुड न्यूज! आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग? पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:02 PM 2021-05-17T16:02:28+5:30 2021-05-17T16:08:00+5:30
Corona Vaccine: स्पुटनिक व्ही (sputnik v) लसीचा पर्याय आता कोविन अॅपवर दिसू लागला आहे. त्यामुळे कोविन अॅपवरून स्लॉट बुक करता येऊ शकणार आहे. (CoWIN app portal) गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनावरील नियंत्रणासाठी कोरोना लसींचाच पर्याय असल्याचे सांगितले जात आहे.
भारतात आताच्या घडीला सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. प्रथमच भारताबाहेरील रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. (sputnik v)
भारतात कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, एक दिलासादायक बाब समोर आली आहे. स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय आता कोविन अॅपवर दिसू लागला आहे.
स्पुटनिक व्ही लशींच्या दोन खेप भारतात पोहोचल्या असून, रशियन बनावटीची पहिली लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटीजच्या सदस्याने घेतली. आता या लसीचा पर्याय कोविन पोर्टलवर दिसू लागला आहे. त्यामुळे आता नागरिकांना तीन पर्याय उपलब्ध झाले आहेत.
कोविन अॅपवरून स्लॉट बुक करताना पिनकोड टाकून ऑप्शन सर्च करण्याचा पर्याय आहे. स्पुटनिक व्ही लसीवर क्लिक केल्यास आपल्याला त्याच्याशी निगडीत रुग्णालयांची यादी समोर दिसेल. (CoWIN app portal)
स्पुटनिक व्ही लसीचा एक डोस ९४८ रुपयांना उपलब्ध असणार आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने एकूण किंमत ९९५ रुपये ४० पैसे इतकी असेल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रशियामधून पहिला साठा हा १ मे रोजी भरतात दाखल झाला. स्थानिक औषध प्रशासनाने त्याला १३ मे रोजी मान्यता दिली. पुढील काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात या लसीचा साठा पाठवला जाईल.
दुसरीकडे भारतीय कंपन्यांच्या माध्यमातूनही या लसींची निर्मिती केली जाणार आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आले आहे. जुलैपासून भारतात स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू होणार आहे.
ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत २१६ कोटी डोस उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. यामध्ये कोवॅक्सिनच्या ५५ कोटी डोस, कोविशील्डच्या ७५ कोटी डोस, बायो ई सब युनिट लसीचे ३० कोटी डोस, झायडस कॅडिलाचे ५ कोटी डोस, नोवावॅक्सिनचे २० कोटी डोस, भारत बायोटेकच्या नेझल लसीचे १० कोटी डोस, जिनोवाचे ६ कोटी डोस आणि स्पुटनिकच्या १५ कोटी डोसचा समावेश असेल.