सूरतमध्ये कचऱ्याच्या गाडीतून आणले व्हेंटिलेटर्स; विरोधक म्हणाले, हेच ते गुजरात मॉडेल By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 04:14 PM 2021-04-06T16:14:59+5:30 2021-04-06T16:19:55+5:30
Gujarat News : देशातील इतर भागांप्रमाणेच गुजरातमध्येही कोरोनाचा प्रकोप दिसून येत आहे. गुजरातमधील अहमदाबाद, सूरत या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेका नेत्याने केलेल्या ट्विटमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. देशातील इतर भागांप्रमाणेच गुजरातमध्येही कोरोनाचा प्रकोप दिसून येत आहे. गुजरातमधील अहमदाबाद, सूरत या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेका नेत्याने केलेल्या ट्विटमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सूरतमधील एका रुग्णालयात कचरा वाहून नेण्याच्या गाडीमधून व्हेंटिलेटर्स वाहून नेण्यात आले, असा आरोप काँग्रेसचे गुजरातमधील नेते जुबेर पटेल यांनी एक ट्विट करत दावा केला आहे. गुजरात मॉडेलचे सरकार कोविड-१९ पासून जनतेला अशा प्रकारे वाचवणार का? वलसाड येथून सूरत येथे व्हेंटिलेटर्स कचऱ्याच्या गाडीमधून पाठवले जात आहेत. गुजरात सरकारचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर आहे. याची साक्ष हा फोटो देत आहे. हे सरकार कोरोनापासून जनतेला वाचवण्यास सक्षम आहे का? अजिबात नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सूरतमध्ये कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. येथे दररोज रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवला जात आहे. मात्र शहरामध्ये व्हेंटिलेटरची टंचाई दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी लागली.
मात्र व्हेंटिलेटर्स आणण्यासाठी कचरा वाहून नेणाऱ्या दोन ट्रकचा वापर करण्यात आल्याने टीका होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सूरत महानगरपालिकेचे अधिकारी कचऱ्याच्या ट्रकमधून लाखो रुपयांचे व्हेंटिलेटर्स वाहून आणत काय सिद्ध करू इच्छित आहेत, असा सवाल लोकांकडून विचारला जात आहे.
याबाबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीबाबत लोकांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे ज्याप्रकारे हे व्हेंटिलेटर्स ट्रकमधून भरून आणण्यात आले त्यामुळेही व्हेंटिलेटर्सना नुकसान झाले असण्याची शक्यता होती.
हे व्हेंटिलेटर वलसाड सिव्हिल रुग्णालयातून मागवण्यात आले होते. एसएमसीने हे व्हेंटिलेटर्स आणण्यासाठी दोन टेम्पो पाठवले होते. हे टेम्पो कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येतात. तसेच वलसाड येथून हे व्हेटिलेटर्स व्यवस्थित पॅक न करता तसेच आणण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार ३४ व्हेंटिलेटर्स वलसाड येथे ठेवण्यात आले आहेत. उर्वरित सूरतमध्ये पाठवण्यात आले आहेत.
हे प्रकरण समोर आल्यानंतर वलसाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्हेंटिलेटर्स पाठवताना दाखवण्यात आलेल्या बेफिकिरीचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सूरतच्या सिव्हिल रुग्णालयात सध्या ३०५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. तसेच कोरोना रुग्णांसाठी अतिरिक्त व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्याबाबत सांगण्यात आले आहे. सूरतमध्ये कोरोनाच्या सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे बेडसोबतच व्हेंटिलेटर्सचा तुटवडा जाणवू शकतो.
सूरतमध्ये कोरोनाच्या ७८८ नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. सूरत शहरामध्ये ६०३ आणि ग्रामिण भागातील १८५ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या ही ६८ हजार ६५३ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडासुद्धा १२०३ वर पोहोचला आहे.