OmicronVariant : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांचंही टेन्शन वाढलं! ओमायक्रॉनची 'ही' नवी लक्षणं ठरू शकतात घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 10:45 PM2021-12-29T22:45:30+5:302021-12-29T23:06:37+5:30

'ही' असामान्य लक्षणं दिसताच करून घ्या टेस्ट...

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिअंट जगभरात वेगाने पसरत चालला आहे. यामुळे जगभरातील अनेक देशांनी निर्बंध वाढवण्यास सुरुवात केली आहे. तर काही देशांनी कोरोनाचा अधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनही लागू केले आहे. (Omicron New Symptoms)

भारतासंदर्भात बोलायचे झाल्यास, येथेही ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये रात्रीच्या कर्फ्यूसारखे निर्बंध लागू केले जात आहेत. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे या व्हेरिअंटी नव-नवी लक्षणेही रोजच्या रोज समोर येत आहेत. एवढेच नाही, तर ओमायक्रॉनची लक्षणे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्येही दिसून आली आहेत. तर जाणून घेऊयात, ओमायक्रॉनच्या लक्षणांसंदर्भात आणि त्यापासून कशा प्रकारे बचाव करता येऊ शकतो यासंदर्भात...

संपूर्ण जगात वाढतोय संसर्ग - WHO च्या अहवालात म्हणण्यात आले आहे, की एका आठवड्यात जगभरातील कोरोना संक्रमितांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ओमायक्रॉनमुळे उद्भवलेला धोका 'खूप मोठा' असल्याचे म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने हेही मान्य केले आहे की, अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांमागे ओमायक्रॉनच महत्वाचे कारण आहे. त्याने डेल्टालाही मागे टाकले आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिअंट संसर्गाची प्रकरणे दोन ते तीन दिवसांतच दुप्पट करत आहेत.

देशात ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या 750 हून अधिक - भारतातही ओमायक्रॉनचा आलेख झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडाही 780 च्या पुढे गेला आहे. देशातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 77,002 एवढी आहे.

काय म्हणाले होते, दक्षिण आफ्रिकेतील एक्सपर्ट्स - दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी ओमायक्रॉनच्या सुरुवातीलाच म्हटले होते, की संक्रमित रूग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील याचा पुनरुच्चार करत, ओमायक्रॉन हे कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा कमी घातक असल्याचे म्हटले होते.

घसा खवखवण्या तक्रारी अधिक - डॉ. कोएत्झी यांनी म्हटले होते, की ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांनी घशात दुखण्याऐवजी 'खवखवण्या'ची तक्रार केली होती. Omicron चे हे लक्षण असामान्य आहे. तसेच, टेस्ट केल्या शिवाय याचा अंदाज लावणे अशक्य आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या.

ओमायक्रॉन संक्रमित रुग्णाने केली अशी तक्रार - दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य विभागाचे जनरल प्रॅक्टिशनर डॉ. उनबेन पिल्ले यांनी ओमायक्रॉनच्या नव्या लक्षणांसंदर्भात माहिती दिली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉनची लागण झालेल्या काही रुग्णांनी रात्रीच्या वेळी खूप घाम येणे आणि शरीरात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली होती.

अंगलट येऊ शकतो निष्काळजीपणा - महत्वाचे म्हणजे, ही सर्व लक्षणे सर्दी किंवा थंडीमुळेही दिसतात. थंडी समजून कोरोना टेस्ट न करणे मोठी चूक ठरू शकते. यामुळे ओमिक्रॉन संक्रमित व्यक्ती इतरही अधिक लोकांना संक्रमित करू शकते.

'ही' असामान्य लक्षणं दिसताच करून घ्या टेस्ट... - ताप, खोकला, थकवा, अंगदुखी आणि खवखव ही ओमायक्रॉनची लक्षणे दिसू शकतात. लंडनमधील किंग्ज कॉलेजमधील जेनेटिक एपिडेमियोलॉजी विभागातील प्राध्यापक टिम स्पेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णपणे लसीकरण झालेल्या अथवा बूस्टर डोस घेतलेल्या ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांनी, उलटी सारखे वाटत असल्याची आणि भूक न लागण्याची तक्रार केली होती. तर काही लोकांनी डोकेदुखीचीही तक्रार केली होती.