CoronaVaccine : खूशखबर! स्वदेशी 'कोव्हॅक्सीन'च्या दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला परवानगी, 7 सप्टेंबरपासून होणार सुरूवात By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 05:21 PM 2020-09-06T17:21:35+5:30 2020-09-06T17:41:42+5:30
कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी जगभरात अनेक देश कोरोनावरील लस तयार करण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करत आहेत. आनंदाची बातमी म्हणजे, 'भारत बायोटेक'ने तयार केलेल्या स्वदेशी 'कोव्हॅक्सीन'ला ड्रग रेग्यूलेटरीने नुकतीच दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणासाठी मंजुरी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करण्यासाठी ही लस पूर्णपणे तयार आहे. कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला सोमवारी 7 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.
भारत बायोटेकने तयार केलेल्या या लशीचे देशातील विविध भागांत परीक्षण करण्यात आले आहे. डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की 'गेल्या 3 सप्टेंबरला भारत बायोटेकच्या या लशीसंदर्भात हेल्थ एक्सपर्ट्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली होती. यात लशीचे दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सुरू करण्यासंदर्भात सहमती झाली आहे.
आता परीक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यावर 380 स्वयंसेवकांवर लशीचे परीक्षण करण्यात येणार आहे. लशीचा डोस दिल्यानंतर पुढील चार दिवस सर्व स्वयंसेवकांच्या प्रकृतीची स्क्रिनिंग करण्यात येईल. भारताची ही पहिलीच स्वदेशी कोरोना लस परीक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यावर पाठवण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.
इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसमध्ये परीक्षणाचे प्रिंसिपल इंव्हेस्टिगेटर डॉक्टर ई. व्यंकट राव यांनी सांगितले, आमच्या योजनेप्रमाणे, दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाची लवकरात लवकर सुरुवात करण्याबरोबरच पहिल्या टप्प्यावरील प्रक्रियाही सुरू आहे. भारतात आतापर्यंत तब्बल 41 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
यापूर्वी लस घेणाऱ्या स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने घेऊन लस कितपत प्रभावी आहे याचा, तसेच शरीरातील अँटीबॉडीच्या पातळीचा अंदाज लावण्यात आला होता.
महत्वाचे म्हणजे, डॉ. राव यांनी सांगितले, की पहिल्या टप्प्यावर भारत बायोटेकच्या या लशीचे कसलेही साइड इफेक्ट दिसून आले नाही.
'कोव्हॅक्सीन' भारत बायोटेक आणि ICMR यांनी संयुक्तपणे तयार केली आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक ही Covid-19 लशीवर काम करणाऱ्या भारतातील 7 कंपन्यांपैकी एक आहे.
भारत बायोटेक ही पहिलीच अशी कंपनी आहे, जिला लशीची क्षमता आणि सुरक्षिततेच्या तपासणीसाठी सरकारकडून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाची परवानगी मिळाली आहे.
क्लिनिकल ट्रायलमध्ये लोकांवर प्रायोगिक लशीचे परीक्षण केले जाते. संबंधित लस कितपत प्रभावी आणि सुरक्षित आहे, हे तपासने हा या मागचा उद्देश असतो. अशा प्रकारच्या प्रक्रियेत सर्वसाधारणपणे 10 वर्ष लागतात.
WHOच्या माहितीनुसार, क्लिनिकल ट्रायलसाठी लोक आपल्या इच्छेप्रमाणे येतात. यात ड्रग्ज, सर्जिकल प्रक्रिया, रेडिओलॉजिकल प्रक्रिया, डिव्हाइसेस, बिहेवियरल ट्रिटमेन्ट आणि रोगनिरोधक उपचारांचाही समावेश असतो.