coronavirus: कोरोनाविरोधात या प्राचीन भारतीय उपचार पद्धती परिणामकारक, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 10:09 AM 2020-07-17T10:09:37+5:30 2020-07-17T10:33:45+5:30
अनेक ठिकाणी कोरोनाविरोधातील लसींची चाचणी अंतिम टप्प्याच्या जवळ आली आहे. तर दुसरीकडे काही तज्ज्ञ नैसर्गिक पद्धतीने कोरोनाविरोधात लढण्यासाठी उपाय शोधत आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगासमोर गंभीर आव्हान उभे राहिले. आतापर्यंत जगभरातील कोट्यवधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोनाविरोधातील लस विकसित करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी कोरोनाविरोधातील लसींची चाचणी अंतिम टप्प्याच्या जवळ आली आहे. तर दुसरीकडे काही तज्ज्ञ नैसर्गिक पद्धतीने कोरोनाविरोधात लढण्यासाठी उपाय शोधत आहेत.
आता कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी दोन प्राचीन उपचारपद्धती परिणामकारक असल्याचा शोध काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी लावला आहे. त्या उपचारपद्धती म्हणजे योग आणि ध्यानधारणा (मेडिटेशन).
मेसाच्युसेट्स इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, चोपडा लायब्ररी आणि हावर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या एका लेखामध्ये योग आणि मेडिटेशनची उपयुक्तता विषद केली आहे. योग आणि मेडिटेशन कोरोनाविरोधात लढण्यामध्ये मदतगार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
योग आणि मेडिटेशनद्वारे कसा बरा होईल कोरोना? जर्नल ऑफ अल्टरनेटिव्ह अँड कॉम्प्लिमेंट्री मेडिसिन (जेएसीएम) मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात सांगण्यात आले आहे की, योग आणि मेडिटेशनचे अँटी इंफ्लेमेंट्री परिणाम कोरोनाच्या उपचार पद्धतीत उपयुक्त ठरू शकतात. तसेच योग आणि आणि मेडिटेशनचा अवलंब केल्यास कोरोनाच्या गंभीर रुग्णांनासुद्धा आराम मिळू शकतो.
योग, ध्यानधारणा आणि प्राणायाम या तिन्ही पद्धती श्वसनावर नियंत्रण ठेवत असल्याचे याआधीच्या अनेक शोधांमधून समोर आले आहे. या पद्धती केवळ डिप्रेशनशी लढण्यासच मदत करत नाही तर मेंदूलासुद्धा शक्तिशाली बनवते. त्याशिवाय तणाव आणि इंफ्लेमेशनसुद्धा कमी करते.
अभ्यासानुसार योग आणि मेडिटेशनचा संबंध नर्व्ह सिस्टिम आणि इम्युन सिस्टिमशीसुद्धा आहे. या दोघांचाही प्रभाव इम्युन सिस्टिम पडत असतो. त्यामुळे फुप्फुस आणि श्वसनाच्या संसर्गामध्ये सुधारणा होते.
जेएसीएमचे प्रमुख संपादक जॉन विक्स यांनी कोरोनासारख्या जागतिक साथीविरोधात अधिकाधिक प्राकृतिक पद्धतीने उपचार केला जाऊ शकतो, याचा विचार तज्ज्ञांनी केला पाहिजे, असे आवाहन केले आहे.