coronavirus: भारतीयांना कोरोनावरील लस देण्याबाबत सीरम इन्स्टिट्युटने केली मोठी घोषणा By बाळकृष्ण परब | Published: November 24, 2020 09:47 AM 2020-11-24T09:47:33+5:30 2020-11-24T09:54:30+5:30
Serum Institute Corona Vaccine News : कोरोनाच्या संकटामुळे भारतासमोर गंभीर आव्हान उभे राहिलेले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी झुंजत असलेल्या भारतीयांना दिलासा देणारी बातमी आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे भारतासमोर गंभीर आव्हान उभे राहिलेले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी झुंजत असलेल्या भारतीयांना दिलासा देणारी बातमी आली आहे. लसनिर्मितीच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्युटने भारतीयांना कोरोनावरील लस देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. कोरोनावरील लस भारतात सर्वप्रथम वितरीत करण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचे सीरम इन्टिट्युटने सांगितले.
सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी सांगितले की, आमच्या कंपनीचे लक्ष्य अॅस्ट्राजेनेकाची लस सर्वात प्रथम भारतात उपलब्ध करून देण्याचे आहे. त्यानंतर जगातील इतर देशांना पुरवठा करण्याचा विचार आहे. सीरम इन्स्टिट्युटकडून अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोनावरील लसीचे उत्पादन भारतात सुरू आहे.
अदर पूनावाला यांनी सांगितले की, आपण प्रथम आपल्या देशाची चिंता करावी, ही आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्यानंतर कोव्हॅक्स फॅसिलिटीवर जावे. नंतर इतर तडजोडी आणि करारांची चर्चा करावी. त्यामुळे माझ्या प्राधान्य क्रमांमध्ये सर्वातप्रथम भारत आणि भारतातील जनता आहे.
अदर पूनावाला यांनी सांगितले की, आम्ही भारत सरकारसोबत लसीच्या खरेदीसाठी चर्चा करत आहोत. सीरम इन्स्टिट्युटकडे २०२१ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत आम्ही भारतीय बाजारात विकू शकू, एवढे डोस असतील. अदर पूनावाला यांनी हे विधान अॅस्ट्राजेनेका या औषध कंपनीने आपली लस ९० टक्के प्रभावी असल्याच्या केलेल्या दाव्यानंतर केले आहे.
आपली कोरोनावरील लस ही जगातील सर्वात स्वस्त, सुरक्षित आणि सक्षम लस असल्याचा दावा अॅस्ट्राजेनेकाने केला आहे. तसेच आपल्याकडे लसीचे स्वस्त उत्पादन आणि सक्षम वितरण करण्यासाठी आवश्यक ते धोरण तयार असल्याचेही अॅस्ट्राजेनेकाने म्हटले आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्युट आणि अॅस्ट्राजेनेका वर्षअखेरीस लसीच्या आपातकालीन वापरास मान्यता देण्याची परवानगी मिळवण्यासाठी सरकारकडे अर्ज करण्यात येणार आहे.
अदर पूनावाला यांच्या मतानुसार पुढीलवर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत त्यांची कोरोनावरील लस बाजारात येणार आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या लसीच्या एका डोसची किंमत सुमारे एक हजार रुपयांपर्यंत असेल. जर सरकारने मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्याची ऑर्डर दिली तर किंमत कमीसुद्धा होऊ शकते.
सीरम इन्स्टिट्युटकडे पाच डझनहून अधिक देशांसोबत लसीसाठी करार करण्याचा अधिकार आहे, असे पूनावाला सांगतात. अॅस्ट्राजेनेकासोबत झालेल्या करारानुसारच हे करार करता येतील. सीरम इन्स्टिट्युट आपल्या भारतीय युनिटमधून अॅस्ट्राजेनेकाच्या लसीच्या ४० कोटी डोसची निर्मिती जुलै २०२१ पर्यंत करू शकते, असेही पूनावाला यांनी सांगितले.