Coronavirus : “त्या गंभीर चुकांमुळे भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झाली भयावह परिस्थिती” By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 08:53 PM 2021-05-12T20:53:19+5:30 2021-05-12T21:03:38+5:30
Coronavirus in India: कोरोनाबाबत चुकलेल्या धोरणांवरून सध्या भारत सरकारवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, अमेरिकेतील संसर्गजन्य आजारांबाबतचे प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फाऊची यांनी कोरोनास्थिती हाताळण्यात भारताकडून नेमकी कोणती चुक झाली याची माहिती दिली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या भारतात भयावर परिस्थिती निर्माण झाली आहे. दैनंदिन रुग्णवाढीचा वेग अद्याप कमी झालेला नाही. तसेच रुग्णांवरील उपचारांसाठी रुग्णालये, बेड्स, ऑक्सिजन आणि औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाबाबत चुकलेल्या धोरणांवरून सध्या भारत सरकारवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, अमेरिकेतील संसर्गजन्य आजारांबाबतचे प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फाऊची यांनी कोरोनास्थिती हाताळण्यात भारताकडून नेमकी कोणती चुक झाली याची माहिती दिली आहे.
अमेरिकेतील सिनेटर्सना संबोधित करताना डॉ. फाऊची यांनी सांगितले की, भारताने कोरोनाबाबत काही चुकीचे अंदाज बांधले. रुग्णसंख्या कमी झाल्यावर कोरोना संपुष्टात आला, असा समज करून घेतला. वेळेआधीच सर्व निर्बंध हटवले. त्याचा परिणाम म्हणून भारत कोरोनाच्या गंभीर संकटात फसला.
फाऊची यांनी सिनेटच्या आरोग्य, शिक्षण आणि मनुष्यबळ समितीला संबोधित करताना सांगितले की, भारतामधील सध्याच्या संकटाचे कारण हे रुग्णसंख्या वाढत असताना कोरोना विषाणू संपुष्टात आला, अशी समजून करून घेण्यात आली. त्यामुळे सर्व निर्बंध हटवून सारे काही उघडण्यात आले. त्यामुळे भारतात आता काय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याबाबत वेगळे काही सांगण्याची गरज नाही.
तर सिनेटर्स पॅटी मुर्रे यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे भारतात उडालेला हाहाकार हा इतरांसाठी धडा आहे. आम्ही अमेरिकेमध्ये ही महासाथ संपुष्टात आली असे तोपर्यंत म्हणू शकत नाही जोपर्यंत हा विषाणू प्रत्येक ठिकाणाहून नष्ट होत नाही.
यावेळी मुर्रे यांनी विचारलेल्या काही प्रशांना उत्तरे देताना फाऊची यांनी सांगितले की, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण कोरोनाच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसरीबाब म्हणजे सार्वजनिक आरोग्याबाबत आपल्याला हरप्रकारची तयारी करून ठेवावी लागेल. आपल्याला भविष्यकालीन महामारीच्या संकटांबाबतही तयारी करून ठेवावी लागेल. आपल्याला सार्वजनिक आरोग्य सुविधांची उभारणी करण्याचे काम सुरू ठेवावे लागेल.
कोरोना ही जागतिक महामारी आहे. तिचा सामना करण्यासाठी जागतिक प्रतिक्रिया निर्माण होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. हे केवळ आपल्याच नाही तर अन्य देशांच्या मदतीसाठी धावून जाण्याची गरज आहे. विशेषकरून लसीच्या बाबतीत याची अधिक गरज आहे, असे फाऊची म्हणाले.
जर जगातील कुठल्याही भागात कोरोना विषाणूचा प्रकोप सुरू राहिला तर तो अमेरिकेसाठीही धोकादायक ठरेल. विशेषकरून विषाणूच्या व्हेरिएंट्सबाबत अधिक धोका असेल. सध्या भारतात एक व्हेरिएंट आहे तो एकदम नवीन आहे. तसेच भारतील सध्याच्या परिस्थितीवरून खूप काही शिकण्यासारखे आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत भारतात अडीच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २ कोटीहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.