coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:02 PM 2020-07-16T12:02:09+5:30 2020-07-16T12:23:12+5:30
खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा परिस्थितीत एका कोरोनाबाधित रुग्णाला मात्र काहीसा वेगळा अनुभव आला आहे. या व्यक्तीचे कोरोनावरील उपचारांसाठी झालेले तब्बल दीड कोटींचे बिल रुग्णालयाने माफ केले. कोरोना विषाणूच्या फैलावाने सध्या सर्वांसमोर गंभीर आव्हान उभे केले आहे. तसेच कोरोनावर अद्याप कुठलीही लस उपलब्ध न झाल्याने तसेच खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
अशा परिस्थितीत एका कोरोनाबाधित रुग्णाला मात्र काहीसा वेगळा अनुभव आला आहे. या व्यक्तीचे कोरोनावरील उपचारांसाठी झालेले तब्बल दीड कोटींचे बिल रुग्णालयाने माफ केले.
तेलंगाणामधील जगीताल येथील रहिवासी असलेले ओदनला राजेश हे दुबईत वास्तव्यास होते. दरम्यान २३ एप्रिल रोजी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर दुबई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या रुग्णालयामध्ये ४२ वर्षीय राजेश यांच्यावर ८० दिवस उपचार सुरू होते. दरम्यान तब्बल ८० दिवस चाललेल्या उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. दरम्यान, या उपचारांचे तब्बल सात लाख ६२ हजार ५५५ दिऱ्हम (सुमारे एक कोटी ५२ लाख रुपये) एवढे बिल रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या हातावर ठेवले.
त्यानंतर राजेश यांच्या सुरुवातीपासून संपर्कात असलेले आणि त्यांना रुग्णालयात घेऊन जाणारे दुबईमधील गल्फ वर्कर्स प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष गुंदेली नरसिम्हा यांनी हा प्रकार दुबईतील भारतीय वाणिज्य दुतावासाचे अधिकारी श्रीमानसुथ रेड्डी यांच्या कानावर घातला.
तसेच वाणिज्य दुतावासातील अधिकारी हरजित सिंग यांनी दुबईतील संबंधित रुग्णालय प्रशासनालाही पत्र लिहिले आणि माणुसकीच्या भूमिकेतून या गरीब रुग्णाचे बिल माफ करण्याची विनंती केली.
दरम्यान, या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. तसेच दुबईतील या रुग्णालयाने सकारात्मक प्रतिसाद देत राजेश यांचे बिल माफ केले.
त्यानंतर राजेश आणि त्यांच्या अन्य एका सहकाऱ्याला मायदेशीर परतण्यासाठी मोफत तिकीट आणि खर्चासाठी दहा हजार रुपयेसुद्धा देण्यात आले. दरम्यान, राजेश हे मंगळवारी रात्री आपल्या शहरात पोहोचले. तिथे विमानतळावर अधिकाऱ्यांनी त्यांना रिसिव्ह केले आणि कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. आता राजेश यांना १४ दिवसांसाठी होम क्वारेंटाइन करण्यात आले आहे.