CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या लाटेच्या विळख्यात लहान मुलं; नेमका किती धोका?, तज्ज्ञ म्हणतात... By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 02:44 PM 2022-04-19T14:44:00+5:30 2022-04-19T15:04:19+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: चिंताजनक परिस्थिती आहे कारण कोरोनाच्या नव्या लाटेच्या विळख्यात चिमुकले सापडत आहेत. मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,247 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 521966 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
कोरोनामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंताजनक परिस्थिती आहे कारण कोरोनाच्या नव्या लाटेच्या विळख्यात चिमुकले सापडत आहेत. मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत आहे.
दिल्ली-NCR मधील अनेक शाळांमधील विद्यार्थी हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विद्यार्थ्यांना संसर्ग होत असल्याने आता सुरू झालेल्या शाळा बंद करण्यात येत असून ऑनलाईन क्लास सुरू करण्यात आले.
राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे. नव्या लाटेत शेकडो चिमुकले संक्रमित होत आहेत.
दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादच्या अनेक शाळेतील मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यावर तज्ज्ञांनी काहीही काळजी करण्याचं कारण नसल्याचं म्हटलं आहे. मुलांमध्ये काही हलकी लक्षणं आढळून येत आहेत. लहान मुलं लवकर बरी होत आहेत.
एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकांना घाबरण्याची गरज नाही. कारण डेटानुसार मुलांना जरी लागण झाली तरी त्यांच्यात फार कमी लक्षणं दिसतात आणि ती लवकर बरी देखील होत आहेत.
जी मुलं लस घेण्यास पात्र आहेत त्यांनी जरूर लस घ्यावी. ICMR चे एडीजी समीरन पांडा यांनी 1 ते 17 वयोगटातील मुलांनी कोरोनाची लागण होऊ शकते याचे पुरावे असल्याचं म्हटलं आहे. पण मृत्यूचा धोका कमी असल्याचं सांगितलं आहे.
शाळेमध्ये मास्क आणि कोरोना नियमावलीचं नीट पालन करण्याची आवश्यकता असल्याचं देखील सांगितलं आहे. तसेच काही तज्ज्ञांनी शाळा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना महामारीबाबत लादण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत. शाळांमध्ये पुन्हा मुलं परतली आहेत. पण याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लहान मुले वारंवार आजारी पडत असल्याचं दिसून येत आहे.
हे कोणत्याही विशिष्ट ठिकाणी किंवा परिसरात घडत नसून, देशभरात अचानक मुले आजारी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासाठी कोरोना विषाणू थेट जबाबदार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मुलांच्या प्रतिकारशक्तीमुळे हे घडत आहे. कोरोनाच्या वेळी लॉकडाऊन आणि निर्बंध असताना मुले बहुतेक घरातच राहिली आणि आता ती बाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीत मुलांच्या शरीराला बाहेरील वातावरणाशी जुळवून घेण्यास वेळ लागत असल्याने ते वारंवार आजारी पडत आहेत.
मुलांमध्ये खोकला, एलर्जी, व्हायरल इन्फेक्शन, श्वसनाच्या समस्या आणि पचनाच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे अनेक बालरोगतज्ज्ञांनी सांगितले. या समस्या लहान मुलांमध्ये आणि ज्यांना याआधी त्रास झाला आहे त्यांच्यामध्ये अधिक दिसून येत आहे.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की कोविड-19 महामारीचा मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भीतीने लोकांनी जवळपास दोन वर्षे मुलांना जास्त बाहेर पडू दिले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाला आहे.
लहान मुले शाळा, उद्याने आणि इतर मोकळ्या जागेत खेळताना किंवा समाजात असताना धूळ, व्हायरस आणि सूक्ष्म कणांच्या संपर्कात येतात. ते शरीरात अँटीबॉडीज तयार करतात आणि हानिकारक व्हायरस, बॅक्टेरियापासून संरक्षण करण्यास मदत करतात.