CoronaVirus: भारतीय वैज्ञानिकांच्या लढ्याला मोठं यश! देशात कोरोनाची पहिली लस तयार; जुलैमध्ये होणार ट्रायल By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 08:16 AM 2020-06-30T08:16:39+5:30 2020-06-30T08:31:00+5:30
कोरोनावरची ही लस भारत बायोटेकने बनवली आहे. विशेष म्हणजे या लसीला मनुष्यावर प्रयोग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना संकट दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत असतानाच एक आनंदाची बातमी येऊन धडकली आहे.
भारतात कोरोनावरची पहिली लस तयार करण्यात आली असून, जुलैमध्ये तिची क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार आहे. कोरोनावरची ही लस भारत बायोटेकने बनवली आहे.
विशेष म्हणजे या लसीला मनुष्यावर प्रयोग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकला सोमवारी ही परवानगी भारतीय ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) दिली आहे.
भारत बायोटेक ही हैदराबादची फार्मा कंपनी आहे, जिनं कोरोनावर लस बनविल्याचा दावा केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, 'कोव्हॅक्सिन'च्या फेज -१ आणि फेज -२च्या मानवी चाचण्यांसाठी डीसीजीआयकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चाचणीचे काम सुरू केले जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. भारत बायोटेकला लस बनवण्याचा पूर्वीचा अनुभव आहे.
. यापूर्वी कंपनीने पोलिओ, रेबिज, रोटाव्हायरस, जपानी एन्सेफ्लायटिस, चिकनगुनिया आणि झिका विषाणूची लसदेखील बनविल्या आहेत.
कोरोना विषाणूशी संबंधित SARS-CoV-2 स्ट्रेनला पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे वेगळं करण्यात आलं आहे.
त्यानंतर स्ट्रेनला भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले आहे. कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेकने विकसित केलेली पहिली स्वदेशी लस आहे.
हैदराबादच्या जीनोम व्हॅलीमधील सर्वात सुरक्षित लॅबमधील बीएसएल -3 (बायोसॅफ्टी लेव्हल 3) मध्ये ही लस तयार करण्यात आली आहे.
कंपनीने प्री-क्लिनिकल अभ्यास आणि रोगप्रतिकारक प्रतिसादाचा अहवाल सरकारला सादर केला आहे. यानंतर डीसीजीआय आणि आरोग्य मंत्रालयाने मनुष्यावर प्रयोगसाठी फेज -१ आणि फेज -२ ला मान्यता दिली आहे. यासह जुलैमध्ये देशात या लसीची चाचणी सुरू होणार आहे.
कोव्हॅक्सिन ही भारतात तयार केलेली पहिली लस आहे. आयसीएमआर आणि एनआयव्हीने ही लस तयार करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
तसेच मनुष्यावर प्रयोग करण्याची परवानगी मिळविण्यात डीसीजीआयने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा अल्ला यांच्या म्हणण्यानुसार, संशोधन व विकास (आर अँड डी) टीमच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं आहे.