आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा वेग मंदावतोय, बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने दिला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 01:19 PM2021-01-24T13:19:48+5:302021-01-24T13:36:18+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाबाबतची सुखावणारी माहिती समोर आली आहे. उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही दररोज वाढत आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल 9 कोटींवर गेला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,06,54,533 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,53,339 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14,849 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 155 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र याच दरम्यान अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

कोरोनाबाबतची सुखावणारी माहिती समोर आली आहे. उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही दररोज वाढत आहे. अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून व्हायरसवर मात केली आहे.

देशात अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून व्हायरसवर यशस्वीरित्या मात केली आहे. गेल्या 24 तासांत 15,948 लोक बरे झाले आहेत. तर 1,03,16,786 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.

देशात सध्या कोरोनाचे 1,84,408 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच देशाचा रिकव्हरी रेटही चांगला आहे. त्यातही वाढ होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83 टक्क्यांवर गेले आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून उपचारानंतर ठीक झाल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील मृत्यूदर हा 1.43 टक्क्यांवर आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर आतापर्यंत देशात तब्बल 19,17,66,871 कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कोरोना लसीकरण मोहिमेदरम्यान संक्रमणाचा वेगही मंदावलेला पाहायला मिळत आहे.

कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत भारताने अव्वल स्थान मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्रालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली होती. भारतात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा हा जगभरात सर्वाधिक आहे.

जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे.

भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसींचा डोस विकत घेण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्धांना पहिल्या फेरीत लस दिली जात आहे.

स्टील उत्पादक श्रेत्रातील जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड, महिंद्रा ग्रुप आणि आयटीसीसारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घेण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे.

सरकारकडून प्रथामिक स्तरावर कोरोना लसीची मागणी संपल्यानंतर ही लस बाजार उपलब्ध होईल. त्यावेळी या मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाची लस विकत घेतील असं सांगितलं जात आहे.

आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांत कोरोना लसीकरण मोहिमेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. सध्या मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे,