CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार? By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 02:02 PM 2020-07-20T14:02:15+5:30 2020-07-20T14:21:06+5:30
कोरोनापासून सुटका होईल, अशी लस केव्हापर्यंत तयार होईल. हा एकच प्रश्च सध्या सर्वांच्या मनात आहे. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी जगातील अनेक देश कंबर कसून आणि दिवसरात्र एक करून काम करत आहेत. सध्या जगभरात तब्ब 18 लसींची मानवी चाचणी सुरू आहे. यांपैकी दोन लसी भारतीय आहेत.
हैदराबादच्या 'भारत बायोटेक' आणि अहमदाबादची कंपनी 'जायडस कॅडिला'ने या लसी तयार केल्या आहेत. नुकतीच यांची चाचणीही सुरू झाली आहे. कोणत्याही लसीचा शेवटचा टप्पा हा मानवी चाचणीच असतो. मानवी चाचणीचा कालावधी मोठा असतो. अनेकदा तर निकालापर्यंत पोहोचायला अनेक वर्षही लागतात.
ह्यूमन ट्रायल म्हणजे नेमकं काय? - कुठल्याही औषधाच्या मानवी चाचणीला ह्यूमन ट्रायल, असे म्हटले जाते. या चाचणीत अथवा परीक्षणात प्रामुख्याने दोन पैलूंचा अभ्यास केला जातो. एक, लस अथवा औषध सुरक्षित आहे अथवा नाही. दोन, संबंधित औषध खरोखरच आपले काम करण्यास आणि संबंधित व्हायरसविरोधात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास सक्षम आहे का?
किती लोक घेऊ शकतात भाग? - मानवी चाचणीच्या कोणत्या टप्प्यावर किती स्वयंसेवकांनी भाग घ्यायला हवा. यासाठी कुठल्याही प्रकारचा अंतरराष्ट्रीय ठकताळा निश्चित करण्यात आलेला नाही. साधारणपणे, याच्या पहिल्या टप्प्यात कमी लोकांवर औषधाची चाचणी केली जाते. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात लोकांच्या मोठ्या समुहावर याची चाचणी केली जाते. मात्र, अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अथोरिटीने यात लोकांच्या संख्येसंदर्भात माहिती दिली आहे.
वेगवेगळ्या टप्प्यावर किती लोक होऊ शकतात सहभागी? - 1. मानवी चाचणीचा पहिल्या टप्प्या स्वयंसेवकांची संख्या 20 ते 100 असू शकते. 2. मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात स्वयंसेवकांची संख्या 100 हून अधिक असू शकते.
3. मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात स्वयंसेवकांची संख्या 1000 पेक्षा अधिक असू शकते. 4. मानवी चाचणीच्या चौथ्या टप्प्यात हजारो लोकांवर औषधाची चाचणी केली जाते.
भारतीय लसीच्या यशाची आशा किती? भारतात कोरोना व्हायरसच्या दोन लसींची मानवी चाचणी करण्यात येत आहे. पहिली लस हैदराबादच्या भारत बायोटेकने ICMR (इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च)च्या साथीने बनवली आहे. तर दुसरी सलस अहमदाबादची प्रायव्हेट फार्मास्यूटिकल कंपनी जायडस कॅडिलाने विकसित केली आहे.
भारत बायोटेक - भारत बायोटेकने विकसित केलेली लस Covaxin च्या मानवी चाचणीला जुलै महिन्याच्या मध्यापासून सुरूवात झाली. मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात 375 लोक भाग घेत आहे. चाचण्यांचे एकत्रित टप्पे पूर्ण होण्यासाठी एक वर्ष आणि तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा संशोधकांचा अंदाज आहे.
जायडस कॅडिला : जायडस कॅडिला ने तयार केलेली लस ZyCoV-D देखील जुलै महिन्याच्या मध्यात मानवी चाचणीच्या टप्प्यावर पोहोचली आहे. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील चाचणीसाठी एकूण 1,048 लोक सहभागी होत आहेत. या लसीची मानवी चाचणी पूर्ण व्हायला तब्बल एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.
WHOच्या मते, जगात सुरू असलेल्या लसींच्या शर्यतीत 7 जुलै 2020 पर्यंत कही लसीच मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकल्या आहेत. यात सिनोव्हॅक (चीन) आणि ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेका (ब्रिटेन) यांच्या नावाचा समावेश आहे.
जगातील सर्वात मोठी औषध निर्माता कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (भारत) ऑक्सफोर्डच्या या लसीचे प्रोडक्शन करत आहे. याशिवाय अमेरिकेच्या मॉडर्ना इंकदेखील आपल्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे.