Coronavirus : कोरोनाच्या संकटात जगातील सर्वात मोठं कुटुंब कसं राहतंय एकत्र, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 07:49 PM 2020-04-28T19:49:42+5:30 2020-04-28T20:02:11+5:30
मिझोरममध्ये जगातलं सर्वात मोठं कुटूंब असून या कुटुंबातील 181 सदस्य 100 खोल्यांच्या घरात एकत्र राहतं. कोरोनाच्या संकटात हे सर्वात मोठं कुटुंब कसं एकत्र राहतंय हे जाणून घेऊया. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखांवर पोहोचली आहे.
मिझोरममध्ये जगातलं सर्वात मोठं कुटूंब असून या कुटुंबातील 181 सदस्य 100 खोल्यांच्या घरात एकत्र राहतं. कोरोनाच्या संकटात हे सर्वात मोठं कुटुंब कसं एकत्र राहतंय हे जाणून घेऊया.
जिओना चाना आपल्या 39 पत्नी आणि इतर सदस्यांसोबत आनंदाने राहतात. त्यांना तब्बल 94 अपत्ये आहेत. त्यासोबतच 14 सूना आणि 33 नातवंडे आणि एक पंतूसोबत हे सगळे आनंदाने मिझोरमच्या बटवंग गावात एकाच घरात राहतात.
एकाच घरात राहणाऱ्या या परिवारावर कोरोनाचा कोणताही परिणाम झालेला नाही आहे. मिझोरममध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकच रुग्ण आढळला आहे. खबरदरीचे सर्व उपाय तिथे घेण्यात येत आहेत.
जिओना यांचं कुटुंब देखील प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी योग्य खबरदारी घेत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गात ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.
जिओना यांना जगातल्या सर्वात मोठ्या कुटुंबाचा प्रमुख असल्याचा गर्व आहे. जिओना हे आपल्या परिवाराला मोठ्या शिस्तीने चालवतात. परिवारातील सर्वच लोक खूप आनंदाने राहतात. कधीही भांडण होत नाही. घरातील सगळी कामे एकत्र येऊन केली जातात.
कुटुंबातील महिला शेती करतात आणि घर चालवण्यात योगदान देतात. जिओनाची सर्वात मोठी पत्नी घराची प्रमुख म्हणून जबाबदारी बघते. तीच घरातील सर्व कामांचं नियोजन आणि वाटप करते.
एका सर्वसामान्य घरात दोन महिने लागणारा किराणा या घरात एकाच दिवसात संपतो. एका दिवसात 45 किलो तांदूळ, 30 ते 40 कोंबड्या, 25 किलो डाळ, 60 किलो भाज्यांची गरज असते.
एकीकडे जिथे देशात एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा बदलत आहे. तर एकाच छताखाली इतकं मोठं कुटुंब एकत्र राहत असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसतो.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवल्या गेलेल्या या परिवाराचे सदस्य एका गावाप्रमाणेच आहेत. एकाच परिवारातील इतके मतदान मिळत असल्याने अनेक नेते त्यांना फार महत्व देतात.