CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! अहोरात्र केली रुग्णांची सेवा पण...; कोरोनामुळे तब्बल 594 डॉक्टर्सना गमवावा लागला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 09:03 AM2021-06-02T09:03:55+5:302021-06-02T09:13:43+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत.

देश कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही दोन कोटींवर पोहोचली आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून विविध उपाय केले जात आहेत. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र याच दरम्यान कोरोना वॉरिअर्सनाच कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तब्बल 594 डॉक्टर्सचा बळी घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association -IMA) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे 594 डॉक्टर्सचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या डॉक्टरांपैकी सर्वाधिक डॉक्टर राजधानी दिल्लीतील आहेत. आयएमएकडून राज्यांप्रमाणे डेटा शेअर केला असून यामध्ये दिल्लीनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. एकूण मृत्यूंपैकी 45 टक्के मृत्यू हे या तीन राज्यांमध्ये झाले आहेत.

कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण 1300 डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याचं आयएमएने सांगितलं आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं आहे.

योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर टीका करताना आयएमएने पत्र लिहिलं असून त्यांनी कोरोनाविरोधातील सरकारच्या लढाईला नुकसान पोहोचवलं असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रामदेव बाबा यांनी देशातील लोकांमध्ये कोरोनासंबंधी प्रोटोकॉल आणि लसींसंबंधी गोंधळ निर्माण केला असल्याचं सांगत आयएमएने ही देशविरोधी भूमिका असल्याचा उल्लेख देखील केला आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना मे महिना सर्वात धोकादायक ठरला आहे. नवीन रुग्ण आणि मृतांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. फक्त मे महिन्यात कोरोनाच्या 90.3 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

महिन्याच्या शेवटी थोडासा दिलासा मिळाला. मात्र तरीही एप्रिलच्या तुलनेत 30% जास्त आहे. एप्रिल महिन्यात एकूण 69.4 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तसेच मे महिन्यात जवळपास एक लाख 20 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

मृतांचा हा आकडा खूपच जास्त असून एप्रिलच्या तुलनेत अधिक आहे. जगातील सर्वात वाईट कोरोना महिन्याबद्दल बोलायचे मे आधी तर डिसेंबर महिना अमेरिकेसाठी सर्वात धोकादायक ठरला.

डिसेंबरमध्ये अमेरिकेत एकूण 65.3 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. या वर्षाच्या जानेवारीत अमेरिकेसाठी मृत्यूचा आकडा सर्वात धोकादायक होता. यावर्षी जानेवारीमध्ये कोरोनाने अमेरिकेत 99,680 लोकांचा बळी घेतला.

डिसेंबर महिन्यात, अमेरिकेत 83,849 लोकांनी आपला जीव गमावला. त्याच वेळी, या वर्षाचा एप्रिल हा मृत्यूच्या बाबतीत ब्राझीलसाठी सर्वात खराब महिना ठरला. यावर्षी एप्रिलमध्ये ब्राझीलमधील कोरोनामुळे 82,401 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र काही ठिकाणी कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक आहे.