CoronaVirus Live Updates : दिल्ली पुन्हा कोरोनाच्या विळख्यात; "गेल्या 15 दिवसांत संसर्गाच्या प्रकरणात 500 टक्क्यांनी वाढ"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 08:49 PM2022-04-17T20:49:11+5:302022-04-17T21:05:30+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.

देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. तर पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

देशात कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत असतानाच आता काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. शनिवारी दिल्लीत 461 प्रकरणे नोंदवली गेली. आता दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट वाढून 5.33 टक्के झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान दिल्लीत कोविड 19 संदर्भात एक सर्वेक्षण समोर आले आहे. सर्वेक्षणात करण्यात आलेला दावा खरोखरच धक्कादायक आहे आणि त्यात थोडंसंही तथ्य असेल, तर भविष्यात धोका वाढू शकतो, याचा अंदाज बांधता येतो.

दिल्लीत कोरोनावर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला आहे की, सोशल मीडियावर आपल्या जवळच्या व्यक्तींना कोविड असल्याची माहिती देणाऱ्या लोकांच्या संख्येत 500 टक्के वाढ झाली आहे.

दिल्ली एनसीआरमधील सुमारे 19 टक्के लोकांनी एका सर्वेक्षणात सांगितले आहे की त्यांना ओळखणाऱ्या एक किंवा अधिक लोकांना गेल्या 15 दिवसांत कोरोना संसर्ग झाला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकलसर्कल या कोरोना प्रकरणांवर सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने सांगितले की, गेल्या 15 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर संसर्गाच्या प्रकरणांमध्ये 500 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. सर्वेक्षणात दिल्ली आणि एनसीआरमधील सर्व जिल्ह्यांतील 11,743 लोकांकडून माहिती घेण्यात आली.

लोकसर्कल फर्मने सांगितले की ज्यांनी उत्तर दिले त्यापैकी सुमारे 67 टक्के पुरुष तर 33 टक्के महिला होत्या. या सर्वेक्षणाचे निकाल अशा वेळी समोर आले आहेत जेव्हा दिल्लीत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, शनिवारी दिल्लीत 461 नवीन रुग्ण आढळले, तर कोविड संसर्गामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला. यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी दिल्लीत 484 रुग्ण आढळून आले होते.

15 मार्च 2022 नंतर प्रथमच दिल्लीत कोविडमुळे एकापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.