CoronaVirus Live Updates : दिल्लीत आठवडाभरात रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांची गर्दी; ICU,ऑक्सिजन सपोर्टवरील आकडा तिप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 10:52 AM2022-04-29T10:52:25+5:302022-04-29T11:10:09+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

देशात कोरोनाचा वेग मंदावत असताना आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक राज्यातील रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल चार कोटींवर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,377 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेत कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,23,753 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांची आकडेवारी सावधगिरी बाळगण्याचे संकेत देत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच दिल्लीत प्रकरणे वाढू लागली.

एप्रिलच्या मध्यापर्यंत रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली होती. 14 ते 20 एप्रिल दरम्यान केवळ 48 कोरोना रूग्ण रूग्णालयात दाखल झाले होते, परंतु गेल्या आठवड्यातील म्हणजेच 7 ते 13 एप्रिलच्या आकडेवारीपेक्षा हे प्रमाण 12 पट जास्त आहे.

रुग्णालयांमध्ये केवळ 4 नवीन रुग्ण दाखल झाले. आता 21 ते 27 एप्रिल दरम्यान 57 रूग्ण रूग्णालयात दाखल झाले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत ही वाढ 18 टक्के आहे. तर दुसरीकडे, आयसीयू आणि ऑक्सिजन सपोर्टवर रुग्णांची संख्या वाढली आहे.

7 ते 13 एप्रिल दरम्यान आयसीयूमध्ये 4 आणि ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांची संख्या शून्य होती, मात्र पुढच्या आठवड्यात म्हणजेच 14 ते 20 एप्रिल दरम्यान 12 रुग्ण आयसीयूमध्ये आणि 11 ऑक्सिजन सपोर्टवर होते.

21 ते 27 एप्रिल दरम्यान यामध्ये आणखी वाढ नोंदवण्यात आली. 26 नवीन रुग्णांना आयसीयूमध्ये आणि 32 नवीन रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर दाखल करण्यात आले, जे मागील आठवड्याच्या तुलनेत अनेक पटीने जास्त आहे.

रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने दिल्ली सरकार आणि आरोग्य विभाग सातत्याने सांगत आहे की, हे रुग्ण कोरोनामुळे थेट दाखल होत नसून इतर आजारांमुळे त्यांना दाखल करावे लागत आहे.

भरतीच्या वेळी कोविड चाचणीचा नियम असल्याने तपासणीत अनेक रुग्णांना संसर्ग झाल्याचे आढळून येते. सध्या दिल्लीतील रुग्णालयांमधील एकूण कोरोना रुग्णांबद्दल बोलायचे झाले तर त्यांची संख्या 148 आहे. त्यापैकी 129 कोरोना बाधित असून 19 कोरोना संशयित आहेत

दिल्लीत कोरोना रुग्णांसाठी 9,390 बेड रिझर्व्ह आहेत. पण रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे, दिल्लीत कोरोना व्हायरसचा कहर आता दिवसेंदिवस वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशभरात कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण 98.74 टक्के इतकं आहे. तर गेल्या 24 तासांत देशात 2496 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांची गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिली तर दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

आज समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 0.71 टक्के इतका झाला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 0.63 टक्के इतका झाला आहे. देशात आतापर्यंत चार कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण मृत्यूंचा आकडा पाच लाखांवर गेला आहे.