CoronaVirus Live Updates : बापरे! रेल्वेच्या 1952 जणांना कोरोनामुळे गमवावा लागला जीव; रोज 1000 कर्मचाऱ्यांना होतोय संसर्ग By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:50 AM 2021-05-11T10:50:24+5:30 2021-05-11T11:16:44+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींवर गेली आहे. मृतांच्या आक़डा वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 15 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींवर गेली आहे. मृतांच्या आक़डा वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोनामुळे भारतीय रेल्वेच्या 1952 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
रोज जवळपास 1000 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. भारतीय रेल्वेत तब्बल 13 लाख कर्मचारी काम करतात.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोणत्याही राज्ये किंवा प्रदेशांप्रमाणे रेल्वेची स्थिती काही वेगळी नाही. रेल्वेही कोरोनाच्या संसर्गाचा सामना करत आहे. आम्ही वाहतुकीचं काम करतो."
"प्रवासी आणि मालवाहतूक करतो. यामुळे रोज जवळपास 1 हजार कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होत आहे. आमच्याकडे रुग्णालये आहेत. बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. रेल्वे रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच प्लांट उभारण्यात आले आहेत."
"आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतो. ते लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. गेल्या वर्षी मार्चपासून ते आतापर्यंत रेल्वेच्या 1952 कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे" असं शर्मा यांनी सांगितलं.
कोरोना व्हायरसच्या संकटात डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पहिल्या फळीतील कोरोना योद्धे ठरवण्यात आलं. त्यांच्याप्रमाणेच रेल्वे कर्मचाऱ्यांना भरपाई दिली गेली पाहिजे. रेल्वे कर्मचाऱ्यांचाही करोनाने संसर्गाने मृत्यू होत आहे, अशी मागणी ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
काही दिवसांपूर्वीच हे पत्र रेल्वे मंत्र्यांना देण्यात आलं आहे. सध्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना 25 लाखांची भरपाई दिली जात असल्याचं देखील पत्रात म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर दोन लाख लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान थोडा दिलासा मिळाला आहे.
देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (11 मे) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 3,29,942 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनामुळे 3,876 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,29,92,517 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,15,221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,90,27,304 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी मात्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.