दिल्लीमध्ये कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे; नाईट कर्फ्यू, मास्कबाबत केली 'ही' मोठी घोषणा By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 04:12 PM 2022-02-25T16:12:40+5:30 2022-02-25T16:21:49+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 302 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे.
देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत आता घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 302 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे.
कोरोनामुळे देशात 5,13,226 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाची प्रकरणे कमी केल्यानंतर दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संसर्ग रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे.
डीडीएमएच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डीडीएमए बैठकीत सांगितले की, आता कोरोना नियंत्रणात आहे आणि दिल्लीत सर्व काही सुरू केलं पाहिजे.
दिल्लीतील कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह दर एक टक्क्यापेक्षा कमी झाल्यास दिल्लीतील रात्रीचा कर्फ्यू सोमवारपासून संपणार आहे, सध्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू आहे.
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीनंतर दिल्लीत मास्क न घालण्याचा दंडही कमी करण्यात आला आहे. मास्क न घातल्याबद्दल 2000 रुपयांचा दंड कमी करून 500 रुपये करण्यात आला आहे.
डीडीएमएने दिल्लीत बस आणि मेट्रोमध्ये उभे राहून प्रवास करण्याची परवानगीही दिली आहे. यासोबतच दुकाने उघडण्याची आणि बंद करण्याची मुदतही संपणार आहे. याशिवाय रेस्टॉरंट्स उघडण्यासाठी वेळेची मर्यादा नसेल आणि रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत सुरू राहू शकतील.
दिल्लीतील कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर एक एप्रिलपासून सर्व शाळा पूर्णपणे सुरू होणार आहेत. आता एक एप्रिलपासून शाळा पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने चालणार आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 556 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.
कोरोना संसर्गामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. सध्या दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 2,276 आहे. DDMA ची बैठक उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (25 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5 लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 1,34,235 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 4,22,46,884 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत.