CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला नाही तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 08:47 AM2021-09-07T08:47:52+5:302021-09-07T08:56:39+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतात जर नवा व्हेरिएंट आला नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी असल्याचं मत आता तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत.

कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. काही देशांमध्ये यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने बेड्सची कमतरता जाणवत आहे. तर आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 22 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णसंख्या 221,975,758 वर पोहोचली आहे. तर 4,588,795 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 198,575,144 लोकांनी कोरोनावर मात केली असून ते उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांचा आकडा हा तीन कोटींवर गेला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून धडकी भरवणारा ग्राफ समोर येत आहे.

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. असं असताना तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. संशोधनातून कोरोनाबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत असते. तज्ज्ञांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतात जर नवा व्हेरिएंट आला नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी असल्याचं मत आता तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरशः धुमाकूळ घातला. देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

अजूनही दुसरी लाट पूर्णतः ओसरलेली नसून केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेबाबत एक दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी याबाबत आता महत्त्वाची माहिती दिली आहे.

डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. भारतात येऊन गेलेली कोरोनाची दुसरी लाट ही डेल्टा व्हायरसमुळेच आली होती. त्यामुळे अनेकांना डेल्टाची लागण होऊन गेली असून हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं मत डॉ. गगनदीप कांग यांनी म्हटलं आहे.

भारतीयांना आता डेल्टा व्हायरसची फारशी भीती नसून जर कुठलाही नवा व्हेरिएंट आला नाही, तर तिसऱ्या लाटेची फारशी भीती नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. भारतीयांच्या शरीरात या व्हायरसविरोधात अँटिबॉडिज तयार झाल्या आहेत.

अनेक नागरिकांचं लसीकरणदेखील झालं आहे. त्यामुळे डेल्टा व्हेरिएंटचा दुसऱ्या लाटेएवढा गंभीर परिणाम निश्चितच होणार नसल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. डेल्टा व्हेरिएंटचा आणि तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचं सांगितलं जातं. चिमुकल्यांना कोरोनाची लागण होत आहे.

भारतात लवकरच लहान मुलांचं लसीकरण सुरू होणार असल्याचं चित्र आहे. त्यासाठी वेगाने काम देखील सुरू करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या चार कंपन्यांच्या लसींना मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. चीनमधून संसर्गास सुरुवात झालेल्या या व्हायरसबाबत अजूनही वेगवेगळी मतमतांतरे मांडली जात आहेत. यादरम्यान अमेरिकेतील ज्येष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉक्टर अँथनी फौसी यांनी एक दावा केला आहे. कोरोना लसीचे सामान्यतः दोन डोस जगभरात दिले जात आहेत.

अमेरिकेसह काही देशांमध्ये, हाय रिस्क असलेल्या लोकांना लसीचे तीन डोस देखील दिले जात आहेत. पण आता डॉक्टर अँथनी फौसी यांनी लोकांना येत्या काळात कोरोना लसीच्या तीन डोसची आवश्यकता असू शकते असं म्हटलं आहे. त्यांच्या मते, दोन डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनी, कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी कमी होत आहेत.

फौसी यांनी या संबंधित काही डेटा देखील दाखवला आहे. फौसी यांनी इस्रायलचा डेटा शेअर केला. इस्रायलमध्ये मोठ्या संख्येने लोकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, 10 लाख लोकांना ज्यांना लसीचे तीन डोस देण्यात आले आहेत. त्यांच्यावर त्यांचा खूपच चांगला परिणाम झाला आहे.