CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! ...म्हणून पुढचे 3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे; वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 08:32 AM 2021-04-20T08:32:58+5:30 2021-04-20T08:47:37+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यावर तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं दिली आहेत. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. देशभरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून एकूण रुग्णसंख्येने तब्बल दीड कोटीचा टप्पा आता पार केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus 2nd Wave) कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 12 दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट दुप्पट झाला आहे. तर 10 राज्यांत 78 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत.
देशात कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यावर तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं दिली आहेत. पुढील तीन आठवडे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत असं म्हणत तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
सेंटर फॉरसेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे तीन आठवडे भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. यादरम्यान लोकांना कोरोनाचे नियम हे पाळावे लागतील.
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉक्टर मिश्रा यांनी रुग्णालयामध्ये बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर आणि लसीची कमतरता कायम राहिल्यास देशात भयंकर स्थिती उद्भवेल. त्यामुळे पुढचे तीन आठवडे देशासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
लोकांना कोरोनाचे नियम सक्तीने पाळावे लागतील. नाहीतर इटलीची परिस्थिती आपण सर्वांनी पाहिली आहे. इटलीत ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला असं म्हटलं आहे.
कोरोनाची दुसरी लाट येणार हे निश्चित होतं. गेल्या काही महिन्यांत अनेकांनी सांगितलं की व्हायरसचा प्रभाव कमी झाला आहे. मात्र हा कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीसाठी आपण तयार राहायला हवं.
भारतात दुसऱ्या लाटेत आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे संक्रमण वेगाने वाढत आहे, असं मिश्रा यांनी म्हटलं आहे. लोकांनी घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणं सोडलं आहे, हे देखील कोरोनाचं संक्रमण वेगाने वाढण्याचं एक मुख्य कारण आहे.
कोरोनाला हरवण्यासाठी लस हे सर्वात मोठं शस्त्र आहे. मात्र तरीही लोकांनी नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बऱ्याच प्रकरणांमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना हा व्हायरस हवेतून पसरतो. त्यामुळे मास्क लोकांना कोरोनाची लागण होण्यापासून 80 ते 90 टक्के वाचवू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. भारतात कोरोनाच्या दैनंदिन संक्रमणाचा दर गेल्या 12 दिवसांत दुप्पट होऊन 16.69 टक्के झाला आहे.
आठवड्याचा संक्रमणाचा दर 13.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये या दहा राज्यांत 78.56 टक्के रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
छत्तीसगडमध्ये सर्वाधिक आठवड्याचा संक्रमण दर 30.38 टक्के आहे. त्यापाठोपाठ गोवा 24.24 टक्के, महाराष्ट्र 24.17 टक्के, राजस्थान 23.33 टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये 18.99 टक्के आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनामुळे देशात 1,78,769 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे.
कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आणि धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात दर तीन मिनिटाला एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दर 3 मिनिटाला एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होत असल्याची आणि एका तासात दोन हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली असून दुसऱ्या लाटेत ग्रोथ रेटही वाढत आहे. मुंबईत कोरोनाचा ग्रोथ रेट वाढून 1.53 टक्के इतका झाला आहे. ग्रोथ रेट वाढत असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी व मृत्यू दरात काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.