CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! 13 वर्षीय मुलामध्ये आढळला 'दुर्मिळ कोरोना'; मेंदूवर करतोय घातक परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 03:15 PM 2021-06-28T15:15:56+5:30 2021-06-28T15:36:59+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनावर जगभरात विविध ठिकाणी संशोधन सुरू आहे. खबरदारीचे सर्व उपाय हे केले जात आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,02,79,331 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,96,730 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,148 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 979 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा वेग सध्या मंदावताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगसह मास्क वापरण्याचा सल्ला जगभरातील तज्ज्ञ देत आहेत. अनेक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे.
कोरोनावर जगभरात विविध ठिकाणी संशोधन सुरू आहे. खबरदारीचे सर्व उपाय हे केले जात आहेत. याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कर्नाटकमध्ये एका 13 वर्षांच्या मुलाला दुर्मिळ कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
कर्नाटकातील 13 वर्षाच्या मुलामध्ये मेंदूवर परिणाम करणारा असा दुर्मिळ कोरोना व्हायरस आढळून आला आहे. कर्नाटक राज्यात घडणारी ही पहिली घटना आहे. रविवारी एस एस इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज एंड रिसर्च सेंटर (SS Institute of Medical Sciences and Research Center) ने या संदर्भातली माहिती दिली आहे.
एक्यूट नेक्रोटायजिंग एन्सेफलोपॅथी (ANEC) असं म्हटलं जातं. हुविनाहदगली गावातील एका 13 वर्षांच्या मुलामध्ये हा दुर्मिळ कोरोना आढळून आला आहे. संस्थेचे संचालक डॉ. एन के कलप्पनवार यांनी पीटीआयशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
"13 वर्षीय मुलगा नुकताच कोरोनामुक्त झाला होता आणि त्यानंतर तो ANEC बाधित झाला. आतापर्यंत अशी परिस्थिती होती की कोविड- 19 नंतर मुलांना फक्त मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमचा सामना करावा लागत होता. मात्र आता आपल्याला ANEC कडेही लक्ष द्यावं लागेल."
डॉ. एन के कलप्पनवार यांनी "माझ्या मते राज्यात अशा दुर्मिळ कोरोनाचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे. मुलाच्या शरीरात अॅन्टीजेन्सचे उच्च प्रमाण आढळलं. ज्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय. मुलाची प्रकृती आता ठिक होत आहे" असं म्हटलं आहे.
"या आजाराचा वेळेत उपचार केले नाहीत तर तो प्राणघातक ठरू शकतो. या आजारावर उपचार देखील खूप महाग आहेत. या आजाराच्या उपचारावरील एका इंजेक्शनची किंमत 75 हजार ते एक लाखांपर्यंत आहे" असं ही कलप्पनवार यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लहान मुलांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्या नियमानुसार कोरोना संसर्ग झालेल्या मुलांवर सिटी स्कॅनचा उपयोग हा समजदारीने करावा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्स सर्विसने (DGHS)या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एसिम्पटोमॅटिक आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉईडचा वापर हा घातक असल्याचं म्हटलं आहे.
18 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांवर रेमडेसिवीरच्या वापरावर पुरेशी सुरक्षा आणि प्रभावी आकड्यांचा अभाव आहे. यामुळे त्यांचा उपयोग करण्यापासून वाचलं पाहिजे असं म्हटलं आहे. रुग्णालयामध्ये दाखल गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांच्या उपचारात अतिशय बारकाईने देखरेख ठेवत स्टेरॉइड औषधाचा उपयोग करण्याची सूचना देण्यात आली आहे. ही सूचना फक्त गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांसाठीच आहे.
लहान मुलांसाठी 6 मिनिटांच्या वॉक टेस्टची सूचना करण्यात आली आहे. 12 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांची पालकांच्या देखरेखीखाली 6 मिनिटांची वॉक टेस्ट करावी. वॉक टेस्टमध्ये मुलाच्या बोटांना ऑक्सिमीटर लावून त्याला सलग 6 मिनिटं चालण्यास सांगावं.
ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल आणि पल्स रेट मोजावी. यामुळे हायपोक्सियाचे निदान होईल, असं मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. तसेच सौम्य लक्षणं दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पॅरासिटामोल (10-15 MG) देता येऊ शकते. कफ असल्यास मोठ्या मुलांनी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात असंही म्हटलं आहे.