CoronaVirus Live Updates : कोरोनाचं रौद्ररुप! "येत्या काही दिवसांत मृतांचा आकडा होणार दुप्पट"; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 03:10 PM 2021-05-06T15:10:48+5:30 2021-05-06T15:21:55+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. संशोधन सुरू असून त्यातून नवनवीन माहिती समोर येत आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 15 कोटींच्या वर गेली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.
देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे.
रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंतेत भर पडत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यानंतर आज तब्बल चार लाख नवे रुग्ण सापडले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. संशोधन सुरू असून त्यातून नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यांना येत्या काही दिवसांत कोरोना मृतांच्या आकडा दुप्पट होईल असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
बंगळूरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका टीमने गणितीय मॉडेलच्या मदतीने भविष्यवाणी केली आहे की, देशात रुग्णांचा संख्या जर अशीच वाढत राहीली तर 11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद केली जाईल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही आठवड्यात ही स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या ही सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट असू शकते असं रिसर्चमध्ये म्हटलं आहे.
कोरोनाच्या नियमांचं पालन न केल्यास रुग्णांची आणि मृतांची संख्या ही आणखी वाढू शकते. कोरोनापुढे अमेरिकेसारखा प्रगत देशही हतबल झाला आहे. अमेरिकेतील रुग्णांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे.
कोरोनामुळे देशात भीषण परिस्थिती आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर रांगा लागल्या आहेत. मृतदेहांचे ढीग पाहायाला मिळत आहे. रुग्णालयात देखील बेड आणि ऑक्सिजनची कमतरता आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने गेल्या काही महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गुरुवारी (6 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 4,12,262 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,10,77,410 वर पोहोचली.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 23,01,68 वर पोहोचला आहे. रिपोर्टनुसार, देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही 35,66,398 आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाच्या संकटात दिलासादायक बाब म्हणजे 1,72,80,844 लोकांनी कोरोनावर मात केली असून ही लढाई जिंकली आहे. केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिला आहे.
केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. भारतात करोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे असं म्हटलं आहे.
"सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं" असं राघवन यांनी म्हटलं आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल य़ांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3,82,315 रुग्ण आढळले आहेत. अशी 12 राज्ये आहेत जिथे 1 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
7 राज्यांत 50,000 ते 1,00,000 सक्रिय रुग्ण आहेत. तर 17 राज्यांत 50,000 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. देशातील 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे पॉझिटिव्हीची रेट हा 15 टक्क्यांहून अधिक आहे.
अग्रवाल यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये मृत्यूची संख्या अधिक असल्याचं म्हटलं आहे. तसेच काही ठिकाणी चिंताजनक परिस्थिती आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.