CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न! 'या' राज्यात घरोघरी वेगाने वाढताहेत रुग्ण; 7 दिवसांतील आकडे धडकी भरवणारे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 04:25 PM2022-07-31T16:25:50+5:302022-07-31T16:59:49+5:30

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. असं असताना आता पुन्हा एकदा कोरोनाचा वेग पाहायला मिळत आहे.

देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19673 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 45 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. असं असताना आता पुन्हा एकदा कोरोनाचा वेग पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या धडकी भरवणारा वेग पाहायला मिळत आहे. दिल्ली, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमध्ये दररोज एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.

राजधानी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यासोबतच दिल्लीतील विविध भागात घरोघरी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळेच गेल्या आठवडाभरात होम आयसोलेशनमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 1600 वरून 2300 वर पोहोचली आहे.

सौम्य लक्षणांमुळे रुग्ण घरीच उपचार घेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, आरोग्य विभागाने कंटेनमेंट झोनची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी दिल्लीत कोरोनाचे 1245 नवीन रुग्ण आढळले. यासह, सक्रिय रुग्णांची संख्या 3844 झाली आहे.

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे. लोकनायक रुग्णालयाचे सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

चांगली बातमी म्हणजे गंभीर रुग्णांची संख्या जास्त नाही. दोन दिवसांत संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. रुग्णालयात फक्त तेच रुग्ण दाखल केले जातात, जे इतर आजारांवर उपचारासाठी आधीच दाखल झाले होते.

एम्सच्या डॉ. अनन्या गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचे रुग्ण बाहेरून रुग्णालयात पोहोचत नाहीत. मात्र, वॉर्डात दाखल असलेल्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.

रुग्णांची सुरक्षितता लक्षात घेऊन एम्सकडून स्वतंत्र वॉर्डही तयार करण्यात आला आहे. मात्र, येथे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. या रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील लाखो लोकांनी कोरोनावर मात केली असून रिकव्हरी रेट 98.48 टक्के आहे. देशातील काही राज्यांत कोरोनाचा वेग पुन्हा वाढत आहे. लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे.