CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! "कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही; 44 सेकंदात होतोय एकाचा मृत्यू"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 01:30 PM2022-09-12T13:30:43+5:302022-09-12T13:49:22+5:30

CoronaVirus Live Updates : डब्ल्यूएचओचे प्रमुख ट्रेडोस एधानोम घेब्रेयसस यांनी कोविड 19 मुळे जागतिक स्तरावर अजूनही दर 44 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे असं म्हटलं आहे.

जगभरात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून अनेक प्रगत देश हतबल झाले आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 61 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 613,896,770 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 6,516,758 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

592,712,798 लोकांनी कोरोनावर मात केली असून ते उपचारानंतर बरे झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांत खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग कमी झाला असला तरी, WHO अजूनही लोकांना त्याच्या धोक्याबद्दल इशारा देत ​​आहे.

कोरोनामुळे अजूनही लोकांचा मृत्यू होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख ट्रेडोस अॅधानोम घेब्रेयसस यांनी कोविड 19 मुळे जागतिक स्तरावर अजूनही दर 44 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे असं म्हटलं आहे.

डब्ल्यूएचओचेने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस सहजासहजी नष्ट होणार नाही. नोंदवलेले प्रकरण आणि मृत्यूंमध्ये जागतिक घट सुरूच आहे. हे खूप उत्साहवर्धक आहे, परंतु हे ट्रेंड कायम राहतील याची शाश्वती नाही. घेब्रेयसस यांनी जाहीर केलेली आकडेवारी कमी धक्कादायक नाही.

"फेब्रुवारीपासून, साप्ताहिक मृत्यूची संख्या 80 टक्क्यांहून अधिक घसरली असती. दर 44 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जे मृत्यू होत आहेत ते बर्‍याच प्रमाणात रोखले जाऊ शकतात. महामारी संपलेली नाही. जोपर्यंत हा विषाणू संपणार नाही, तोपर्यंत ही गोष्ट सांगता येणार नाही" असं म्हटलं आहे.

डब्ल्यूएचओ पुढील आठवड्यात सहा संक्षिप्त धोरणांचा एक संच प्रकाशित करेल, ज्यात संक्रमण कमी करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी प्रमुख मुद्द्यांची रूपरेषा असेल. कोरोनाने अनेक देशांचं टेन्शन वाढवलं असून तिथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा थेट परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो. त्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. आरोग्य तज्ज्ञ अजूनही यावर संशोधन करत आहेत. याच दरम्यान, एका संशोधनात कोरोनाचा दीर्घकाळ परिणाम आढळून आला आहे. म्हणजेच कोरोना नंतरची समस्या ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो.

संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतरही त्याची लक्षणे 180 दिवस टिकू शकतात. यामुळे तुम्हाला थकवा, तणाव, शरीरात तणाव जाणवेल. दुसरीकडे, पुरुषांसाठी हे आणखी गंभीर आहे कारण त्याचा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

तज्ञांचे म्हणणे आहे की कोविड नंतर 10 महिने देखील, उच्च बीएमआय, डिस्लिपिडेमिया आणि कमी शारीरिक सहनशक्ती कायम राहू शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इतके दिवस सारखी राहत नाही. अशा परिस्थितीत कोरोनामधून बरे होऊनही लोकांनी गाफील राहू नये.

थकवा, धाप लागणे किंवा स्मरणशक्ती कमी होणे, झोपेची समस्या, खोकला, छातीत दुखणे, बोलण्यात अडचण, स्नायू दुखणे, वास न येणं किंवा चव कमी होणे, नैराश्य, ताप आणि शरीरातील वेदना ही सामान्य लक्षणे आहेत. कोणतंही लक्षण जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

ज्या लोकांना कोरोना संसर्गादरम्यान गंभीर लक्षणे दिसतात त्यांना कोरोनानंतरही इतर आजार होण्याची शक्यता असते. तुम्हालाही कोरोना झाला असेल आणि बरे झाल्यानंतरही तुम्हाला समस्या येत असतील, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. लक्षणांकडे दुर्लक्ष करणे जीवघेणं ठरू शकतं.