CoronaVirus: ...तर देशात तिसरा ‘लॉकडाऊन’?; WHOच्या नावाने फिरणाऱ्या ‘त्या’ मेसेजमागचं सत्य By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 04:18 PM 2020-04-06T16:18:21+5:30 2020-04-06T16:38:27+5:30
कोरोना विषाणूचा, कोव्हीड-१९ चा शर्थीने मुकाबला करण्यासाठी, त्याला पराभूत करण्यासाठी अख्खा देश एकजूट झाला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास, नागरिक घराबाहेर न पडल्यास कोरोना संसर्ग रोखता येऊ शकतो, हे स्पष्ट झाल्यानं देशात २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली आहे.
या देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं आणि त्याला जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
सध्या सुरू असलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचं सुजाण नागरिकांकडून तंतोतंत पालन होतंय. संचारबंदीला न जुमानता घराबाहेर पडणाऱ्यांना पोलीस आपला हिसका दाखवत आहेत. असं असतानाही, दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढणार का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.
त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीबाबत WHO ची काही मार्गदर्शक तत्व, नियमावली असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
एक दिवसांचा लॉकडाऊन ही पहिली पायरी, त्यानंतर २१ दिवसांचा लॉकडाऊन ही दुसरी पायरी, मधे पाच दिवसांचा ब्रेक घेऊन गरज पडल्यास २८ दिवसांचा लॉकडाऊन ही तिसरी पायरी आणि त्यानंतरही कोरोनाचा संसर्ग न संपल्यास १५ दिवसांचा लॉकडाऊन ही चौथी पायरी, असे टप्पे WHO नं सुचवल्याचं या मेसेजमध्ये म्हटलंय.
त्याचाच आधार घेत, भारतामध्ये सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. तो ठरल्याप्रमाणे १४ एप्रिलला संपेल. त्यानंतर १५ ते १९ एप्रिलदरम्यान निर्बंध शिथील केले जातील. मात्र, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यास २० एप्रिल ते १८ मे असा २८ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला जाईल, असं या मेसेजमध्ये नमूद केलंय. कोरोनाग्रस्तांची संख्या शून्यावर न आल्यास २५ मे ते १० जून हा तिसरा आणि अखेरचा लॉकडाऊन घेण्याचा पर्याय सरकारकडे असेल, असं वेळापत्रक मेसेजमध्ये आहे.
मात्र, WHO च्या नावाने फिरणारा हा मेसेज साफ खोटा असल्याचं पडताळणीतून समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोव्हीड-१९ बद्दल जनजागृतीच्या दृष्टीने अनेक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु, लॉकडाऊबाबत त्यांचा कुठलाही प्रोटोकॉल ठरलेला नाही. ज्या देशाला जशी आवश्यकता भासेल त्यानुसार तो लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ शकतो, अशी माहिती प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं दिली आहे.
लॉकडाऊन १४ एप्रिलनंतरही कायम राहणार असल्याची चर्चा केंद्र सरकारनं याआधीच फेटाळून लावलीय. तसंच, लॉकडाऊन मागे घेण्याबाबत 'कॉमन एक्झिट प्लॅन' देण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केली आहे.
दरम्यान, एकंदर चित्र पाहता, देशभरातील लॉकडाऊन एकदम न उठवता टप्प्याटप्प्याने शिथील केला जाईल, असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही सर्व एक आहोत, हा संदेश देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवा लावण्याचं आवाहन केलं होतं. त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला. तिमिरातुनी तेजाकडे प्रवास करण्याचं बळ, ऊर्जा या दीपप्रज्ज्वलनातून जनतेला मिळाली.