CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोना मृतांचा आकडा कमी करण्यासाठी मास्क अत्यंत प्रभावीशाली; रिसर्चमध्ये दावा By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 09:08 AM 2021-12-21T09:08:02+5:30 2021-12-21T09:25:36+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 27 कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जाते.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचण्यासाठी मास्क अत्यंत महत्त्वाचा असल्याची माहिती मिळत आहे.
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंतेत भर टाकली आहे. कोरोनाच्या या संकटात आता दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. कोरोना मृतांचा आकडा कमी करण्यासाठी मास्क अत्ंयंत प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
डेक्कन हेराल्डमधील वृत्तानुसार, अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. हे संशोधन 15 फेब्रुवारी ते 31 मे 2020 या कालावधीत 44 देशांमध्ये करण्यात आले आहे.
ज्या देशांनी मास्क अनिवार्य ठेवले, तेथे कोविड-19 मृत्यू दर खूपच कमी असल्याचे आढळून आले. अशा परिस्थितीत, तज्ञांचे म्हणणे आहे की नवीन प्रकारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि लोकांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी मास्क प्रभावी आहे.
अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनने हा रिसर्च प्रकाशित केला आहे. प्रकाशित रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की आदेश नसलेल्या देशांच्या तुलनेत कठोर मास्क नियमांचे पालन करणाऱ्या देशांमध्ये कोविड-19 चा मृत्यूदर लक्षणीयरीत्या कमी असल्याचे आढळून आले आहे.
15 फेब्रुवारी ते 31 मे 2020 या कालावधीत 44 देशांमधील जवळपास एक अब्ज लोकांमधील मास्कचा आदेश आणि कोविड-19 मृत्यूचे प्रमाण तपासले गेले. मास्क नसलेल्या देशांमध्ये प्रति दशलक्ष लोकांमध्ये सरासरी कोविड-19 मृत्यू दर 288.54 असल्याचे आढळले आहे.
ज्या देशांमध्ये मास्क वापरणे अनिवार्य केले आहे तेथे कोविड-19 मृत्यू दर केवळ 48.40 दिसला. लसीकरणात होणारा विलंब जगभरातील आरोग्य यंत्रणांना आव्हान देत आहे असे आढळून आले आहे.
लसीच्या दोन्ही डोसनंतर मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते, परंतु त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे थांबू शकला नाही. तर फेस मास्क दोन्हीपासून काही प्रमाणात संरक्षण करण्यास सक्षम असल्याचे दिसून आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान डबल मास्क लावण्याचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला जात आहे. अनेक सेलिब्रिटी आणि अधिकारी आपल्या चेहऱ्यावर दोन मास्क लावताना दिसत आहेत.
सेलिब्रिटींनी केलेला दोन मास्कचा वापर आणि तज्ज्ञांचा सल्ला बघता वैज्ञानिक दृष्टीकोनातून दोन मास्कचा वापर खरोखर योग्य आहे का हे जाणून घेणे महत्वाचं आहे.तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्यावर दोन मास्क लावल्याने आपले व्हायरसपासून संरक्षण होऊ शकतं.
अनेक मास्क चेहऱ्यावर योग्यरित्या बसत नाहीत, काही सैल असतात. अशावेळी दोन मास्क वापरल्याने संसर्गाची शक्यता कमी असते असं देखील समोर आलं आहे. एक सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क वापरता येईल. एकावर एक दोन कापडी मास्कही वापरणे योग्य आहे.
दोन मास्क वापरण्याचा सल्ला देण्यामागे या मास्कमुळे फिल्ट्रेशन आधिक चांगलं होतं. विमान, रेल्वे अथवा सार्वजनिक जागी म्हणजेच ज्या ठिकाणी गर्दी असेल अशा ठिकाणी दोन मास्कचा वापर करता येऊ शकतो.
दोन मास्कचा वापर केल्यामुळे व्हायरसपासून 50 ते 75 टक्के अधिक बचाव होऊ शकतो असं आणखी एका रिसर्चमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या संशोधनात सर्जिकल प्रकारच्या मास्कच्या पार्टीकल्स हटवण्याच्या क्षमतेवर अभ्यास करण्यात आला होता.