CoronaVirus News : आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठं पाऊल! भारताने 5 देशांना निर्यात केले 23 लाख पीपीई किट By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 02:53 PM 2020-08-15T14:53:17+5:30 2020-08-15T15:13:26+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत भारताने मोठं पाऊल उचललं आहे. देशात आता मोठ्या प्रमाणात पीपीई तयार करण्यात येतं. यासोबतच त्याची निर्यात देखील केली जात आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढला आहे.
देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून 25 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 25,26,193 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 49,036 वर गेला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (15 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 65,002 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 996 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,68,220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 18,08,937 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
कोरोनाच्या संकटात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी दिवसरात्र काम करत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी रुग्णांची सेवा करताना पीपीई किट वापरलं जातं.
देशामध्ये काही महिन्यांपूर्वी म्हणजेच सुरुवातीच्या काळात पीपीई किटचा प्रचंड तुटवडा होता. दुसऱ्या देशांवर निर्भर राहावं लागलं. मात्र आता देशाने आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत भारताने मोठं पाऊल उचललं आहे. देशात आता मोठ्या प्रमाणात पीपीई तयार करण्यात येतं. यासोबतच त्याची निर्यात देखील केली जात आहे.
भारताने पाच देशांना तब्बल 23 लाख पीपीई किटचा पुरवठा केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. तसेच केंद्र सरकारद्वारे राज्यांनाही पीपीई किट्स देण्यात आले आहेत.
अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती, सेनेगल आणि स्लोवानिया या देशांना 23 लाख पीपीई किट् निर्यात करण्यात आल्या आगेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत पीपीई किटच्या निर्यातीमुळे भारताला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
केंद्र सरकारने राज्य सरकार तसेत केंद्रशासित प्रदेशात देखील 1.28 कोटींहून अधिक पीपीई किट, 3.04 कोटींहून अधिक एन-95 मास्कचा मोफत पुरवठा केला आहे.
जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे या उपकरणांची मागणी वाढत गेली. त्यामुळे त्यांची जागतिक बाजारपेठेत देखील कमतरता भासू लागली होती.
वैद्यकीय उपकरणाच्या उत्पादनासाठी देशांतर्गत बाजारपेठ विकसित करण्याच्या निर्णय भारत सरकारने घेतला. पीपीई किट्स, मास्क यांचे उत्पादन करण्यास सुरुवात केली.
आरोग्य, वस्त्रोद्योग, औषधनिर्माण मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, संरक्षण संशोधन व विकास संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांनी भारताने स्वतःची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविली आहे.
देशाने अमेरिकेसह पाच देशांना 23 लाख पीपीई किटचा पुरवठा केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पंतप्रधानांनी कोरोना लसी संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. "कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न पडला आहे, वैज्ञानिक कठोर मेहनत करत आहेत, भारतात तीन लसी विविध टप्प्यात असून प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार" असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. भारतातील तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. संशोधकांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मोठया प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरू होईल. कमीत कमी वेळेत कोरोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार आहे असं मोदींनी म्हटलं आहे.
कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच उपाय केले जात आहे. अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर तब्बल एक कोटीहून अधिक लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे.