CoronaVirus News : भारताकडे कधी असणार कोरोना लस आणि किंमत किती?, रिसर्चमधून आली आनंदाची बातमी By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 06:46 PM 2020-08-28T18:46:41+5:30 2020-08-28T18:59:32+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोना लसीसंदर्भात संशोधन केले जात आहे. या दरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशातील रुग्णसंख्येने 33 लाखांचा टप्पा पार केला आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत देशात तब्बल 60 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत. तसेच लसीसंदर्भात ही चाचण्या केल्या जात आहे.
देशात कोरोना लसीसंदर्भात संशोधन केले जात आहे. या दरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना लस भारतात कधी पर्यंत उपलब्ध होणार आणि त्याची काय किंमत असू शकते याची माहिती मिळत आहे.
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून भारतात कोरोना लस 2021 च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे.
सीरम इन्स्टिट्यूट देशात आपली लस वितरीत करण्याच्या पूर्ण तयारीत असणार आहे. वॉल स्ट्रीट रिसर्च आणि ब्रोकरेज फर्म, बर्नस्टीन रिसर्च यांच्या रिपोर्टमधून हा खुलासा करण्यात आला आहे.
बर्नस्टीनच्या रिपोर्टनुसार, जागतिक पातळीवर सध्या चार लसींना 2020 या वर्षाखेरीस आणि 2021 च्या सुरुवातीच्या तीन महिन्यापर्यंत मंजुरी मिळू शकते.
सध्या भागिदारीच्या माध्यमातून भारताकडे दोन लस आहेत. यामध्ये ऑक्सफर्डची वायरल वेक्टर वॅक्सीन आणि नोवावॅक्सची प्रोटीन सब युनिट वॅक्सीनचा पर्याय आहे.
दोन्ही लसींच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची डेटा सुरक्षितेच्याबाबतीत आणि रोग प्रतिरोधक क्षमतेबाबत आशादायक माहिती मिळत आहे.
भारताच्या जागतिक क्षमतेबाबतही यामध्ये सकारात्मकपणे नमूद करण्यात आले आहे. भारताला लस उत्पादन करण्याबाबतच्या आव्हानांचा सामना करावा लागणार नसल्याची आशा रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
सिरम इन्स्टिट्यूट 2021 मध्ये 60 कोटी डोस आणि 2022 मध्ये 100 कोटी डोसचा पुरवठा करू शकतो. तर गावी द वॅक्सीन अलायन्स आणि निम्म व मध्यम उत्पन्न गटातील देशांना पुरवठा करण्याच्या वचनानुसार, भारतात 2021 मध्ये 40 ते 50 कोटी डोस उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
रिपोर्टनुसार, सरकारला लशीच्या एका डोससाठी तीन डॉलर द्यावे लागणार आहे. तर, नागरिकांना किमान सहा डॉलरला हा लशीचा डोस उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
सिरमशिवाय भारतात आणखी तीन कंपन्या लस विकसित करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जायडस, भारत बायोटिक आणि बायोलॉजिकल ई या कंपन्यांचा समावेश आहे.
काही कंपन्यांची लस ही पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा संदर्भात जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.
सोशल डिस्टंसिंग, मास्क, होम आयसोलेशन, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गुरुवारी कोरोनाचे 75,760 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे देशातील प्रमाण आता 76.24 टक्के झाले असून, त्यांची संख्या 25 लाखांवर पोहोचली आहे.