CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 08:36 AM2020-06-15T08:36:12+5:302020-06-15T08:54:41+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही रुग्ण होम क्वारंटाईन होऊन कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र घरच्या घरी कोरोना व्हारसवर कशी मात करता येईल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

देशामध्ये 11 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 3 लाख 20 हजारांपेक्षा अधिक झाली आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेला भारत चौथ्या क्रमांकावर गेला. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 9915 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रात या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्याच्या परिणामी गेल्या आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येत 70 हजार जणांची भर पडली.

कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध झालेले नसून जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.

कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. जगामध्ये 78 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तर अनेक ठिकाणी रुगणालयात रुग्णांना बेडच मिळत नाही आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोरोना संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही रुग्ण होम क्वारंटाईन होऊन कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र घरच्या घरी कोरोना व्हारसवर कशी मात करता येईल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

घरच्या घरीही कोरोनावर मात करता येते याबाबत डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. अमेरिकेतील मेरिलँड युनिव्हर्सिटी अपर चेसापिक हेल्थचे डॉक्टर फहीम युनूस यांनी लोकांना मार्गदर्शन केलं आहे.

फहीम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लोकांच्या मनातील प्रश्नाचं निरसन केलं आहे. तसेच जर विशेष काळजी घेतली तर 80 ते 90% कोरोना रुग्ण घरच्या घरीच बरे होऊ शकतात असं म्हटलं आहे.

कोरोना व्हायरसची लक्षणं दिसली तर इतरांपासून 14 दिवस वेगळं राहावं. एका वेगळ्या खोलीत राहा. जिथे फक्त तुम्हीच असाल. शक्यतो बाथरूम आणि भांडीही वेगळी असावीत.

जर तुमच्या घरात अशी वेगळी खोली नसेल सर्वजण एकाच खोलीत राहत असतील तर एखादा मोठा पडदा टाकून खोलीचे दोन भाग करा. पडद्याच्या एका बाजूला रुग्ण आणि दुसऱ्या बाजूला घरातील इतर सदस्य राहतील.

बाथरूमही एकच असेल तर सर्वात आधी फेस मास्क घाला. बाथरूम वापरल्यानंतर बाथरूम नीट स्वच्छ करा. तुम्ही वापरत असलेले नेब्युलायझर आणि स्टीम इतरांसोबत शेअर करू नका.

बदलत्या वातावरणामुळे कोरोना आणि सामान्य फ्लू यामधील फरक ओळखणं अवघड होऊ शकतं. यामुळे ताप आल्यानंतर फक्त पॅरासिटामोल किंवा आयबुप्रोफेन हेच औषध घ्या.

शरीराचं तापमान, श्वसनादर आणि रक्तदाब तपासत राहा. मोबाईलवरदेखील असे अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ज्याच्यामदतीने याबाबत माहिती मिळेल.

सेल्फ क्वारंटाईन असताना मनाला शांती मिळेल आणि चिंता कमी होईल अशी काम करण्याचा प्रयत्न करा. काही वेळा दोन ते तीन आठवडेही लागू शकतात. अशा परिस्थिती अजिबात घाबरू नका.

योग्य आहार घ्या, घरात शिजवलेलंच अन्न खा आणि पुरेशी झोप घ्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.

तुमच्या प्रकृतीत यानंतरही सुधारणा होत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा रुग्णालयात दाखल व्हा. अनेक प्रकरणात मृत्यूची शक्यता एक टक्क्यांहूनही कमी असते.

आपलं शरीर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणं हे कोरोनाला हरवण्याचा उत्तम मार्ग असल्याचं देखील डॉ. फहीम यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.