CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्यात 'हे' औषध प्रभावी ठरणार; संक्रमण रोखण्यास मदत करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 08:41 AM2020-06-20T08:41:37+5:302020-06-20T08:59:51+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात आता एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.

जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तब्बल चार लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे.

84 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे.

भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा तीन लाखांच्या वर पोहोचला आहे. तर 12000 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.

कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे.

कोरोनाच्या संकटात आता एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. फेवीपिरवीर (Favipiravir) हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरलं जाणार आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI) कोविड-19 च्या उपचारासाठी फेवीपिरवीर (Antiviral drug Favipiravir) चा वापर करण्यास मंजुरी दिली आहे.

आपात्कालीन परिस्थितीतच या औषधाचा वापर केला जाईल आणि त्यासाठीदेखील रुग्णाच्या नातेवाईकांची परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं डीसीजीआयने स्पष्ट केलं आहे.

हे औषध 14 दिवस दिलं जावं. सुरुवातीला 1 हजार रुग्णांवर या औषधाचे काय परिणाम होतात ते तपासले जावेत, असं ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने सांगितलं आहे.

औषध उत्पादित करणारी ग्लेनमार्क कंपनी भारतात 10 प्रमुख सरकारी आणि खासगी रुग्णालयातील 150 रुग्णांवर फेविपिरवीर औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याच्या तयारीत आहेत.

फेवीपिरवीर औषधाचा वापर जपान, चीन आणि इतर काही देशांमध्ये इन्फ्लुएंजावरील उपचारासाठी होतो. सीएसआयआर एका देशी जडी-बुटीला जैविक औषध अथवा फायटोफार्मास्यूटिकलच्या रूपात विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.

डेंग्यूवरील उपचारात याचा वापर होत आहे. आता यात कोविड-19 सोबत लढण्याची क्षमता आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना संक्रमणातही हे औषध फायदेशीर ठरू शकतं, असं दिसून आलं.

चीनमध्ये कोरोनाग्रस्तांना प्रायोगिक तत्वावर हे औषध देण्यात आलं. इतर औषधांच्या तुलनेत हे औषध व्हायरल झपाट्याने कमी करतं असं दिसून आलं आहे.

कोरोना रुग्णांचं सीटी स्कॅन करण्यात आलं तर त्यामध्ये चांगली सुधारणा दिसून आली. मात्र काही रुग्णांमध्ये या औषधाचे साईड इफेक्टसही दिसून आले आहेत.

कोरोनावरील उपचारात फेवीपिरवीर यशस्वी ठरलं तर लवकरच हे स्वस्त ओषध उपलब्ध होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Read in English