CoronaVirus : भारतात 'या' 5 ठिकाणी होणार कोरोना लसीची चाचणी, असे निवडले जातायत लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 06:30 PM2020-07-28T18:30:21+5:302020-07-28T18:43:27+5:30

भारत सरकारने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, जायडस, कॅडिला आणि भारत बायोटेकच्या लसींसह, देशातील काही लसींच्या मानवी चाचणीसाठी 4 राज्यांतील एकूण 5 ठिकानांची निवड केली आहे. याशिवाय आणखी 6 ठिकानांची तयारीही करण्यात आली आहे. जेथे मानवी चाचणीसाठी स्वस्थ स्वयंसेवक सहजपणे यात सामील होऊ शकतील.

यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेन्टच्या सेक्रेटरी डॉ. रेनू स्वरूप यांनी सांगितले, की औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना चाचणीसाठी सहजपणे स्वयंसेवक उपलब्ध व्हावेत, यासाठी साइट्स तयार आहेत. यामुळे चाचणी करणे सुलभ होईल आणि लवकरात लवकर योग्य निकाल मिळतील.

डॉ. रेनू स्वरूप म्हणाल्या, कोरोनाच्या या परिस्थितीत योग्य स्वयंसेवक शोधणे सोपे नाही. कारण ज्या लोकांना कोरोनाचा संसर्ग नाही, असे लोक आम्ही शोधत आहोत. याच बरोबर ते अॅसिम्प्टोमॅटिक (ज्यांच्यात लक्षण दिसणार नाही.) आणि निरोगी असणेही आवश्यक आहे.

ही पाचही ठिकाणे नॅशनल बायोफार्मा मिशन आणि ग्रँड चॅलेन्जेस इंडिया प्रोग्रॅमअंतर्गत निवडण्यात आली आहेत. हे सर्व, भारत सरकार आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्यात झालेल्या एका करारानुसार करण्यात येत आहे.

कोरोना लसीच्या चाचणीसाठी चार राज्यांतील पाच ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यात, आयएनसीएलईएन ट्रस्ट इंटरनॅशनल पलवल- हरियाणा, केईएम पुणे, सोसाइटी फॉर हेल्थ अलाइड रिसर्च हैदराबाद, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमोलॉजी चेन्नई आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर तमिळनाडू यांचा समावेश आहे.

लसीच्या चाचणीसाठी स्वस्थ लोक न मिळणे, हे लस तयार करणाऱ्या कंपन्यांपूढील सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र, या पाच ठिकाणी लसीच्या चाचणीसाठी कंपन्यांना स्वस्थ स्वयंसेवक मुळू शकतील.

डॉ. स्वरूप यांनी सांगितले, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीची चाचणीही या पाच ठिकानांवरच होईल.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने बनविलेल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील अखेरच्या पायरीवरील चाचणीतून, ती किती सक्षम आहे, किती परिणामकारक आहे आणि कोणत्या वयातील रुग्णांवर कशापद्धतीने काम करते, हे स्पष्ट होईल.