Coronavirus: कोविड १९ च्या रिसर्चनं ज्यानं जगासमोर केली चीनची पोलखोल; ‘तो’ सीकर आहे तरी कोण? By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 10:36 AM 2021-06-06T10:36:50+5:30 2021-06-06T10:42:21+5:30
Coronavirus: संपूर्ण जगाला ज्या कोरोना महामारीनं जाळ्यात ओढलं, या कोरोना विषाणूची निर्मिती झाली कशी? ती नैसर्गिक आहे की, मानवनिर्मित यावर जगभरात रिसर्च सुरू आहे. यातच ३ भारतीयांनी मिळून केलेल्या रिसर्चनं जग आता चीनकडे संशयाच्या नजरेने पाहत आहे. यातील वैज्ञानिक जोडपं जगासमोर आलं आहे. परंतु तिसरा भारतीय सीकर आहे कोण? संपूर्ण जग गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीशी लढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरुवातीला देशांनी लॉकडाऊनचा आधार घेतला त्यानंतर आता कोरोनावर लस उत्पादन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर अनेक देशांनी भर दिला आहे.
कोरोना महामारीमुळे लोकांचे जीवन उद्ध्वस्त झालं. त्यामुळे कोरोनाची उत्पत्ती नेमकी कुठं झाली? हा प्रश्न आजही लोकांच्या मनात कायम आहे. अनेक देश यावर रिसर्च करत आहेत. अमेरिकेने थेट चीनच्या वुहान लॅबवर संशय व्यक्त करत चीननेच कोरोनाची निर्मिती केल्याचं म्हटलं.
आता ३ भारतीयांनी केलेल्या रिसर्चमुळे जगाला पुन्हा एकदा कोरोना महामारी कशी आली हा विचार करायला भाग पाडलं आहे. या रिसर्चमध्ये एक वैज्ञानिक जोडपं डॉ. मोनाली राहलकर आणि डॉ. राहुल बहुलिकर यांच्याशिवाय आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. त्याला जग सध्या ‘द सीकर’ नावानं ओळखतं.
२०-३० वर्षामधील हा युवक जो पूर्व भारतात राहतो. तो आर्किटेक्ट आणि फिल्ममेकरही आहे. विज्ञानात त्याला रुची आहे. स्वत:चं नाव प्रकाशझोतात न आणण्यामागे त्याचं वेगळंच कारण आहे. पैसा नको सुरक्षेची चिंता. ‘द सीकर’ याने टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रश्नांना एनक्रिप्टेड ईमेल पाठवून उत्तर दिलं आहे.
‘द सीकर’ म्हणतो की, मी जगापासून ओळख लपवतो हे माझ्यासाठी योग्य आहे. कारण मला पैसा नको. पैशासाठी सुरक्षा आणि जीवाचा धोका पत्करू इच्छित नाही. कोरोना व्हायरसच्या सुरुवातीवर रिसर्च का केली? या प्रश्नावर त्याने सांगितले की, मला कोरोना विषाणू कुठून आला, कसा आला हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यामुळे मी हा रिसर्च सुरू केला.
आता वर्षभराहून जास्त काळ गेला आहे. मी यात खूप वेळ लावला आहे असं त्याने सांगितले. द सीकर हा DRASTIC टीमचा भाग आहे. ज्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही टीम इंटरनेटवर कोविड १९ आजारावर रिसर्च करत आहे.
द सीकरनं असा पुरावा शोधला की, कोरोना महामारी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीशी निगडीत असल्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. डॉ. मोनाली अनुसार, द सीकर हा खूप चांगला मित्र आणि दिलखुलास व्यक्ती आहे. DRASTIC चे सदस्य एकमेकांसोबत ट्विटरवरून थेट संवाद साधतात.
मोनालीनं सांगितले की, द सीकर हा खूप हुशार आणि विद्वान आहे. त्याला चीनी भाषाही कळते आणि ओपन सोर्स इंटेलिजेंसही समजतं. खरंतर ही माहिती सीकरची आहे. मागील वर्षी द सीकरनं चीनच्या एका मास्टर थीसिसची माहिती समोर आणली.
ज्यात लिहिलं होतं की, २०१२ मध्ये मोझियांगच्या वटवाघळांनी भरलेल्या एका खाणीजवळ ६ कर्मचारी गेले होते. त्यानंतर हे कर्मचारी श्वसनाच्या विकाराने आजारी पडले. हा आजार जवळपास कोविड १९ च्या आजाराशी जुळतो. यातील ३ जणांचा मृत्यू झाला.
द सीकरनं जे संशोधन केले त्याने जगाचं लक्ष वेधलं. आता SARS-COV2 च्या नैसर्गिक आजार असल्याचा दाव्याला थेट आव्हान मिळू लागलं आहे. त्यात DRASTIC रिसर्चचं मोठं योगदान आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
मी खूप सारे फॅक्ट्स आणि डेटा पाहिले असून त्याने संशयाची सुई वुहानच्या लॅबकडे जाते. द सीकरच्या या रिसर्चमुळे तो जगासमोर एका रात्रीत प्रसिद्ध होईल. परंतु तो स्वत: समोर येण्यापासून का थांबतोय? असं विचारला असता त्याने सांगितले मी पहिलंचं सांगितलं आहे. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी स्वत:ची ओळख लपवून ठेवणार आहे.
वैज्ञानिक जोडपं आणि द सीकर यांच्या रिसर्चनं अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या संशोधकांनी सिद्ध केलंय की, मोझियांगच्या खदानीत मिळालेला व्हायरस हा कोविड १९ व्हायरसशी साधर्म्य आहे. याच व्हायरसवर वुहान इन्सिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये RaTG13 वर प्रयोग केला जात होता.