CoronaVirus: शहरातून आलेला नवरा 'क्वारंटिन' झाला; घर 'लॉकडाऊन' करून बायकोनं प्रियकरासोबत पळ काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 10:26 PM2020-05-26T22:26:19+5:302020-05-26T22:32:47+5:30

लॉकडाऊनमध्ये हाताना काम नसल्यानं उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेले मजूर त्यांच्या गावी परतू लागले आहेत.

आपापल्या गावाकडे जाताना मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण दिल्लीहून मध्य प्रदेशात परतलेल्या एका मजुरासोबत वेगळाच प्रकार घडला.

दिल्लीत काम करणारा एक ५० वर्षीय मजूर लॉकडाऊनमुळे मध्य प्रदेशातल्या छत्तरपूर जिल्ह्यामधल्या मुंडेरी गावी परतला.

श्रमिक विशेष रेल्वेनं १९ मे रोजी गावात परतलेल्या मजुराला गावकऱ्यांनी १४ दिवस क्वारंटिन होण्यास सांगितलं.

त्यानंतर मजूर त्याच्याच घराच्या पहिल्या मजल्यावर राहू लागला. त्याची ४६ वर्षीय पत्नी आणि मुले तळमजल्यावर राहत होती.

मजुराची पत्नी आधी त्याच्यासोबत दिल्लीतच वास्तव्यास होती. मात्र दीड वर्षांपूर्वी ती तीन मुलांसह गावी परतली. त्यानंतर मजूर एकटाच दिल्लीत राहत होता.

१९ मे रोजी गावी आलेला मजूर कुटुंबापासून अंतर राखून पहिल्या मजल्यावर राहत होती. चार दिवस तो तिथे होता. २४ मे रोजी त्याला त्याची खोली बाहेरून बंद करण्यात आल्याचं लक्षात आलं.

खोलीला असलेलं कुलूप मुलांना काढण्यास सांगून मजूर खाली आला. मात्र मुलांना आई कुठे गेली, याची कोणतीही कल्पना नव्हती.

मजुरानं संपूर्ण गावात पत्नीची चौकशी केली. मात्र ती कुठेही सापडली नाही. पत्नी पळून गेल्याची कुणकुण लागताच मजुरानं पोलीस ठाणं गाठलं.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून महिलेचा शोध सुरू केला आहे.

Read in English