Coronavirus : अनोखा आदर्श! ...अन् त्याने झाडावरच बांधलं घर, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:36 PM2020-04-10T17:36:26+5:302020-04-10T17:47:51+5:30

Coronavirus : कोरोनाच्या लढाईत सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. याच एक उत्तम उदाहरण उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळालं आहे.

जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 90 हजारांच्या वर पोहोचला आहे.

भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजारांच्या वर पोहोचला आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही.

कोरोनाच्या नियंत्रणासाठी देशात युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लागली असून सर्व राज्यांमध्ये संशयितांची माहिती घेण्याबरोबर तपासणी, क्वॉरंटाईन सुरू केले आहे.

कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग यासारख्या गोष्टी केल्या जात आहेत. सर्वच खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

कोरोनाच्या लढाईत सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. याच एक उत्तम उदाहरण उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळालं आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी एका व्यक्तीने चक्क झाडावरच घर बांधलं आहे.

मुकूल त्यागी असं या व्यक्तीचं नाव असून ते उत्तर प्रदेशच्या हापूड जिल्ह्यात राहतात. सोशल डिस्टन्सिंगसाठी त्यांनी घराच्या जवळ असलेल्या एका झाडावरच आपलं छोटं घर तयार केलं आहे.

सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व लक्षात घेऊनच त्यांनी झाडावर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुकूल त्यागी यांनी हे घर बांधण्यासाठी त्यांच्या मुलाने मदत केली.

झाडावर घर असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात छान वाटते. आनंद मिळतो. कुटुंबीय जेवण झाडावरच आणून देतात. त्यामुळे संपूर्ण वेळ झाडावरच घालतात.

झाडावर मुकूल यांनी एक झोपाळा बांधला आहे. येथेच ते आराम करतात. पुस्तकही वाचतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.