CoronaVirus News: कोरोनाची चौथी लाट येणार का? दोन वर्षांपासून अचूक भाकीत वर्तवणारे IITचे प्राध्यापक म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 09:55 AM2022-04-19T09:55:33+5:302022-04-19T09:58:49+5:30

CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्येत वाढ; देशात कोरोनाची चौथी लाट येणार?

देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची भीती व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या २ वर्षांपासून अचूक भविष्यवाणी करणारे आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.

दिल्लीत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जवळपास ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्तर प्रदेशात आठवड्याभरात रुग्णसंख्या १४१ टक्क्यांनी वाढली आहे. ही आकडेवारी चिंता वाढवत असताना अग्रवाल यांनी वर्तवलेल्या भाकितामुळे काहीसा दिलासा मिळत आहे.

कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता कमी आहे. कारण आतापर्यंत कोणताही नवा म्युटंट आलेला नाही. लोकांमध्ये असलेली रोगप्रतिकारशक्ती ९० टक्क्यांपर्यंत आहे. पण बेजबाबदारपणे वागल्यास म्युटंटचा प्रभाव दिसू लागेल, असं अग्रवाल म्हणाले.

दिल्ली-एनसीआरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामागचं कारणदेखील अग्रवाल यांनी सांगितलं. निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. अनेक जणांनी मास्कचा वापर बंद केला आहे. त्याचा गंभीर परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो, असं अग्रवाल यांनी म्हटलं.

सध्याचा व्हेरिएंट पाहता लोकांची रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत आहे. वातावरणात असलेले कोरोनाचे जुने म्युटंट आपला परिणाम दाखवत आहेत. जुने म्युटंट अद्याप संपलेले नाहीत, अशी माहिती प्राध्यापकांनी दिली.

देशवासीयांनी घेतलेली लस सध्याच्या व्हेरिएंटविरोधात पूर्णपणे प्रभावी आहे. कोणतीही लस संक्रमण थांबवू शकत नाही. पण त्यामुळे गंभीर आजार होत नाही, असं अग्रवाल म्हणाले.

लोकांनी मास्क वापरायला हवा. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करायलाच हवा. संक्रमणापासून बचाव करण्यापासून हात सॅनिटाईझ करायला हवेत, असा सल्ला अग्रवाल यांनी दिला.

आता आपण जितक्या केसेस पाहत आहोत, त्या बरेच दिवस राहणार नाहीत, असं आमचं गणितीय प्रारुप सांगत असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेवेळी अग्रवाल यांनी गणिती मॉडेल मांडलं होतं. देशातील अनेक राज्यांमधील कोरोनाची परिस्थिती त्यांनी स्पष्ट केली होती. कोरोनाची लाट केव्हा टोक गाठणार आणि केव्हा संपणार याचं अचूक भाकीत त्यांनी वर्तवलं होतं.