CoronaVirus News: राज्यात दोन महिन्यांपूर्वीच 'त्या' धोक्याची एंट्री; आरोग्य विभागाची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 02:38 PM2021-06-23T14:38:00+5:302021-06-23T14:44:18+5:30

CoronaVirus News: राज्यातील जनता आणि आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी बातमी

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनं देशाची चिंता वाढली आहे. याच व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येण्याचा धोका आहे.

डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती. आता हाच व्हेरिएंट म्युटेट झाला असून त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झाला आहे.

देशात डेल्टा व्हेरिएंटचे ४० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २१ रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

राज्यात डेल्टा व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी काही रुग्ण एप्रिल महिन्यातील असल्याची माहिती जीनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच राज्यात डेल्टा प्लसची एंट्री झाल्याची चिंताजनक माहिती पुढे आली आहे.

मुंबईत ५ एप्रिल आणि १५ एप्रिलला कोरोनाचे २ रुग्ण आढळून आले. या व्यक्तींचं जिनोम सिक्वन्सिंग करण्यात आलं. त्यातून या दोघांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

दोन महिन्यांपूर्वीच राज्यात एंट्री घेतलेल्या डेल्टा प्लसची लागण किती जणांना झाली, या प्रश्नानं आरोग्य विभागाची झोप उडवली आहे.

एप्रिलमध्ये डेल्टा प्लसची लागण झालेल्यांपैकी एक व्यक्ती ठाण्याची आहे. त्यांचं वय ७८ वर्षे आहे. त्यांनी कोरोनावर मात केली असून सध्याच्या घडीला त्यांची प्रकृती उत्तम आहे.

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्यालादेखील कोरोनाची बाधा झाली होती. तेदेखील आता कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील ६ जिल्ह्यांत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सर्वाधिक ९ रुग्ण रत्नागिरीतील आहेत. तर जळगावात ७ रुग्ण आढळून आले आहेत.

डेल्टा प्ससची लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जळगावात १२ आणि १३ जूनला चाचणी शिबिर घेण्यात आलं. त्यात १६५ जणांची चाचणी घेण्यात आली. त्यात २ जण पॉझिटिव्ह आले. त्यांच्यात कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत.