बापरे! '...तर यंदाची होळी ठरू शकते 'सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना"; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 12:04 PM2021-03-01T12:04:25+5:302021-03-01T12:23:42+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,10,96,731 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15,510 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 106 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,57,157 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान थोडी चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.

देशात सातत्याने कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लोकांनी योग्य ती काळजी न घेतल्यास यंदाची होळी ही "सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना' ठरू शकेल असा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगण आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे.

दिल्लीत जवळपास 35 दिवसांनंतर एका दिवसात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या स्थितीत देशात सामाजिक मेळावे किंवा जाहीर सभा आयोजित करणं योग्य नाही. कारण कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. यासह देशात कोरोनाचा नवा स्ट्रेनही समोर आला असल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे.

कोरोनाच्या बाबतीत आता जर निष्काळजीपणा दाखवला तर येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत खूप मोठी वाढ होऊ शकते. यामुळे अशा परिस्थितीत आपण सार्वजनिक कार्यांपासून दूर राहिलं पाहिजे. विशेषत: होळीच्या वेळी. कारण या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही.

होळीच्या काळात सध्याच्या तुलनेत अनेक पटीने रुग्णसंख्या वाढू शकतात. यामुळे प्रशासनाने दिलेले सूचनांचं पालन नागरिकांनी करणं गरजेचं आहे. तसेच कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नसल्याने काळजी घेणं गरजेचं आहे.

खुल्या मनाने नागरिकांचं स्वागत करा, पण हात मिळवणं आणि मिठी मारण्यापासून टाळा. मास्क घालून कोरोनाशी संबंधित सोशल डिस्टंसिंगसारख्या इतर नियमांचं पालन करा अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात योग्य ती खबरदारी घतेली जात आहे. तसेच विविध उपाय हे केले जात आहेत. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनावरील लस उपलब्ध झाली असली तरी अनेकांच्या मनात शंका आहे. कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहे. ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनावरील घेतली.

आजपासून देशामध्ये लसीकरणाच्या आणखी एका टप्प्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं.

एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली. पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

लस घेताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी यावरून निशाणा साधला आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली काहींनी मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. मोदींनी मास्क न लावल्यामुळे नेटकरी संतापले आहेत.

मोदींनी लस घेताना आसामी गमछा परिधान केला होता. मोदींना लस टोचणाऱ्या नर्स पुद्दुचेरीच्या होत्या. तर त्यांना सहाय्य करणाऱ्या दुसऱ्या नर्स केरळच्या होत्या. आसाम, पुद्दुचेरी, केरळमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. मोदींनी लस टोचून घेतल्यानंतर काहींनी याकडे लक्ष वेधलं.

Read in English