CoronaVirus News: शुभसंकेत! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील 'पॉझिटिव्ह' गोष्टी; देशासाठी १० आनंदाच्या घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:21 PM2021-05-18T19:21:05+5:302021-05-18T19:29:56+5:30

CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रिकव्हरी रेट सुधारत असून दुसरी लाट ओसरू लागली आहे.

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यामुळे देशाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत 'पॉझिटिव्ह' घडामोडी घडल्या आहेत. त्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली.

१. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट वाढला आहे. ३ मे रोजी ८१.७ टक्के असणारा रिकव्हरी रेट आता ८५.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

२. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख २२ हजार ४३६ जणांनी कोरोनावर मात केली. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

३. गेल्या काही दिवसांपासून रिकव्हरीच्या बाबतीत आम्हाला अतिशय स्पष्ट आणि पॉझिटिव्ह ट्रेंड दिसत असल्याची दिलासादायक माहिती अग्रवाल यांनी दिली.

४. बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे. २६ राज्यांमध्ये बऱ्या होणाऱ्यांची संख्या दररोज आढळून येत असलेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे.

५. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. सध्याच्या घडीला देशातील केवळ ८ राज्यांमध्ये दररोज १० हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

६. ७ मे रोजी देशात ४ लाख १४ हजार कोरोना रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासांत हाच आकडा २ लाख ६३ हजारांवर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशात ३ लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे.

७. मेच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या लाटेनं टोक गाठलं होतं. ७ मे रोजी ४ लाख १४ हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता त्यात २७ टक्क्यांनी घट झाली आहे.

८. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ६९ टक्के रुग्ण ८ राज्यांमध्येच आहेत. इतर राज्यांमधील स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे.

९. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी १.८ टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव २ टक्के लोकसंख्येच्या खाली ठेवण्यात आरोग्य मंत्रालयाला यश आलं आहे.

१०. देशाचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेटदेखील खाली आला आहे. सध्या तो १४.१० टक्के असून त्यातही पुढील काही दिवसांत घसरण अपेक्षित आहे.