CoronaVirus News: "भारतात कोरोना मृतांचा आकडा लपवला जातोय; खरी संख्या पाचपट"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 03:58 PM2021-04-26T15:58:56+5:302021-04-26T16:02:24+5:30

CoronaVirus News: प्रशासकीय पातळीवर कोरोना रुग्णांचा आकडा लपवला जात असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सचं वृत्त

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वेगानं वाढत होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना मृतांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं देशातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा सर्वच राज्यांना जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज २ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू आहे. मात्र प्रत्यक्षात हा आकडा त्याहून अधिक असल्याचा दावा न्यूयॉर्क टाईम्सनं केला आहे.

भारताच्या अनेक राज्यांमधील स्मशानभूमींमध्ये दिवसरात्र चिता जळताहेत. या स्मशानभूमींमध्ये येणाऱ्या मृतदेहांचा आकडा आणि प्रशासनाकडे असलेली मृतांची आकडेवारी यात खूप मोठी तफावत असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सनं म्हटलं आहे.

प्रशासन आणि राजकारणी मिळून कोरोना रुग्णांचा आकडा लपवत असल्याचं टाईम्सनं वृत्तात म्हटलं आहे. मिशिगन विद्यापीठात साथीचे रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या भ्रमर मुखर्जींनी भारतातील कोरोना मृतांचा आकडा दोन ते पाचपट असल्याचा दावा केला.

भारतातील कोरोना मृतांचा आकडा लपवला जात आहे. आम्ही केलेल्या अभ्यासानुसार, हा आकडा सध्याच्या दोन ते पाचपट आहे, अशी माहिती मुखर्जींनी दिली.

अहमदाबादमधल्या सर्वात मोठ्या स्मशानभूमीत सध्या दिवसरात्र अंत्यसंस्कार आहेत. इथे काम करत असलेल्या सुरेश भाईंनी अशी परिस्थिती याआधी कधीही पाहिलेली नाही. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेले असतानाही अनेकांच्या मृत्यूचं कारण आजारपण असं नोंदवलं जात आहे.

मृतदेहात अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची नोंद ठेवताना शक्यतो कोरोनाचा उल्लेख करू नका, अशा सूचना स्मशानभूमीत काम करत असलेल्या सुरेश भाईंना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. त्यांच्या वरिष्ठांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

८० च्या दशकात भोपाळमध्ये वायूगळती झाली. त्यात हजारो जणांचा बळी गेला. त्यानंतर प्रथमच भोपाळमधल्या स्मशानभूमींमध्ये इतकी गर्दी पाहायला मिळत आहेत, इतक्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार सुरू आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

एप्रिलच्या मध्यात १३ दिवसांमध्ये भोपाळमध्ये ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. मात्र भोपाळमधील मुख्य स्मशानभूमी आणि कब्रस्तानात कोरोना प्रोटोकॉलसह अंत्यसंस्कार झालेल्यांचा आकडा १ हजाराच्या पुढे असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सनं म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख ९५ हजार १२३ इतकी आहे. मात्र न्यूयॉर्क टाईम्सच्या दाव्यानुसार ती ४ लाख ते १० लाखांच्या आसपास असू शकते.