coronavirus: कोरोनाबाधितांच्या वाढीने घेतला चिंताजनक वेग, एकट्या जुलै महिन्यात वाढले ११ लाख रुग्ण By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 09:07 AM 2020-08-01T09:07:27+5:30 2020-08-01T09:20:22+5:30
शुक्रवारी दिवसभरात देशात तब्बल ५७ हजार नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. एका दिवसात कोरोनाच्या रुग्णांचे झालेले सर्वाधिक निदान आहे. देशात अनलॉक-३ ची आजपासून सुरुवात झाली असली तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक वेगाने वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात तब्बल ५७ हजार नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. एका दिवसात कोरोनाच्या रुग्णांचे झालेले सर्वाधिक निदान आहे.
दरम्यान, जुलै महिन्याचा विचार केल्यास या एका महिन्यात देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेल्या वाढीची भयावह आकडेवारी समोर आली आहे. जुलै महिन्याच्या ३१ दिवसांमध्ये देशात कोरोनाचे तब्बल ११.१ लाख रुग्ण सापडले असून, १९ हजार १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जूनच्या तुलनेत तिप्पटीने वाढले रुग्ण जून महिन्याचा विचार केल्यास जूनच्या तुलनेत जुलैमध्ये देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तिप्पटीने वाढली आहे. जून महिन्यापर्यंत देशात सुमारे चार लाख रुग्ण होते. तसेच जूनच्या तुलनेत जुलैमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही तिप्पटीने वाढला आहे.
जुलैच्या शेवटच्या पंधरा दिवसांत कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर एवढा वाढला की त्यामुळे या दोन आठवड्यातच सुमारे ७,३० लाख रुग्ण सापडले. हा आकडा जुलैच्या पूर्वार्धापेक्षा दुप्पट आहे.
सलग चौथ्या दिवशी सापडले ५० हजारांहून अधिक रुग्ण ३१ जुलै रोजी देशात तब्बल ५७ हजार १५१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. देशात एकाच दिवशी ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडलेला हा सलग चौथा दिवस होता. दरम्यान या एकाच दिवसांत देशभरात ७५० हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
१७ लाखांजवळ पोहोचली देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशात आतापर्यंत कोरोनाच्या तब्बल १६ लाख ९६ हजार ७८० रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ३६ हजार ५५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सुमारे १० लाख ९५ हजार ६४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या देशात पाच लाख ६४ हजार ५८२ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.