Omicron मुळे पुढील ६० दिवस महत्त्वाचे, अन्यथा...; भारतीयांचं टेन्शन वाढवणारा रिपोर्ट By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:09 AM 2021-12-22T10:09:32+5:30 2021-12-22T10:15:58+5:30
Coronavirus new Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगातील अनेक देशांच्या चिंतेत भर टाकली आहे. ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशालाही ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फटका बसत आहे. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या या व्हेरिएंटनं आतापर्यंत ९१ देशांत शिरकाव केला असून ब्रिटन, अमेरिकेसारख्या प्रगतशील देशांची अवस्था पुन्हा बिकट झाली आहे.
ब्रिटनमध्ये दिवसाला ८० हजाराहून अधिक रुग्ण आढळत असून यातील सरासरी १० हजार रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत. भारतातही ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्याच्या घडीला देशात २०० हून अधिक ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. त्यातच आता नवीन आलेला रिपोर्ट सगळ्यांच्या चिंतेत भर टाकणारा आहे.
भारतात फेब्रुवारी महिन्यात कोविड १९ ची तिसरी लाट येऊ शकते असा हा रिपोर्ट आला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढू शकते. मात्र या रिपोर्टमुळे भारताला चिंता करण्याऐवजी सतर्क राहणं गरजेचे आहे.
संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी दावा केलाय की, फेब्रुवारीनंतर पुढील महिन्यात ओमायक्रॉन रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे दिलासा मिळेल. भारतात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २२० इतकी झाली असून त्यात आणखी भर पडेल.
IIT कानपूरचे मनिंद्र अग्रवाल आणि Sutra Modle of Tracking the pandemic trajectory चे सहसंस्थापक एम विद्यासागर यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दिवसाला फेब्रुवारीत १.५ लाख ते १.८ लाख होऊ शकतात. जोपर्यंत नवीन व्हेरिएंट लसीकरणापासून बचाव करेल तोवर संख्या वाढत जाईल.
त्याचसोबत नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट ज्या वेगाने वाढेल तितक्याच गतीने तो कमी होईल. दक्षिण आफ्रिकेत तीन आठवड्यानंतर आता रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोविड रुग्णांची सरासरी संख्या १५ डिसेंबरला जवळपास २३ हजार इतकी झाली होती ती आता २० हजारांपर्यंत खाली आली आहे.
ओमायक्रॉन प्रकरणात भारताला चिंता नाही तर काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र नव्या व्हेरिएंटबाबत आता शोध सुरु आहे. अद्याप हा किती घातक आहे याची कल्पना नाही. जर यूके आणि संयुक्त राज्य अमेरिकेतील मृत्यू आणि हॉस्पिटलमधील भरती रुग्णांचा डेटा पाहिला तर फेब्रुवारीपासून ओमायक्रॉन रुग्णसंख्येत घट होईल अशी शक्यता आहे.
सध्या देशात महाराष्ट्रात ६५, दिल्ली ५४, तेलंगाना २४, कर्नाटक १९, राजस्थान १८, केरळ १५, गुजरात १४, जम्मू ३, यूपी २, ओडिशा २, आंध्र प्रदेश, चंदिगड, तामिळनाडू, बंगालमध्ये प्रत्येक १ ओमायक्रॉन आढळले आहेत. भारतात एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २२० पर्यंत पोहचली आहे.
ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा नव्या व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णात वाढ झाली आहे. याठिकाणी रुग्णसंख्येत मागील आठवड्याच्या तुलनेत ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या ६ टक्क्यांनी वाढली आहे. यूकेत २० डिसेंबररोजी ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ४५ हजारांपर्यंत पोहचली आहे.
वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना सुरू असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा गंभीर इशारा देत सर्व देशांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.