Coronavirus: ओमायक्रॉनची धास्ती! रेड अलर्ट घोषित झाल्यास काय असतील निर्बंध? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 02:45 PM2022-01-03T14:45:46+5:302022-01-03T14:51:26+5:30

Coronavirus new variant omicron: ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संक्रमणामुळे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पुन्हा एकदा अनेक राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे.

भारतात ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एका आठवड्यापूर्वी दिवसाला ६ ते ७ हजार रुग्ण आढळत होते मात्र आता हा आकडा ३३ हजारांवर पोहचला आहे. देशात सर्वात गंभीर परिस्थिती महाराष्ट्रात आहे. याठिकाणी दिवसाला १० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

भारतात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १७०० वर पोहचली आहे. महाराष्ट्रात ५१० संक्रमित रुग्ण आहेत. ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीत रविवारी कोरोना व्हायरसचे ४ हजाराहून जास्त रुग्ण आढळले त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दिल्लीत कोरोना संक्रमणाचा दर ६ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. सध्या दिल्लीत ग्रेडेड रिस्पॉन्स एक्शन प्लॅननुसार(GRAP) येलो अलर्ट आहे त्याला रेड अलर्ट घोषित करण्याची शक्यता आहे.

जर दिल्लीत कोरोना संक्रमण दर ५ टक्क्याहून जास्त झाल्यास GRAP रेड अलर्ट लागू होईल असं स्पष्ट करण्यात आले आहे. जर संक्रमण दर ५ टक्क्यांहून अधिक गेले किंवा दिवसाला १६ हजार रुग्ण आढळले किंवा हॉस्पिटलमध्ये ३ हजार बेड भरले तर त्या स्थितीत रेड अलर्ट लागू होऊ शकतो

मग नेमका रेड अलर्ट लागू झाल्यावर काय निर्बंध लागतील? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. रेड अलर्ट लागल्यास, पूर्णपणे कर्फ्यू लावला जाईल. प्रत्येक विकेंडला तो लागू असेल. शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण सुरु राहील.

दुकानं, व्यापार याठिकाणी केवळ अत्यावश्यक सामान विक्रीला परवानगी देण्यात येईल. स्विमिंग पूल, सर्व स्टेडिएम बंद राहतील. जे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील त्यांच्यासाठीच खेळाचे मैदान तयारीसाठी सुरु राहील. धार्मिक स्थळ सुरु राहतील परंतु भाविकांना जाण्यास बंदी असेल.

लग्नाला परवानगी देण्यात येईल परंतु तिथे केवळ १५ लोकांनाच उपस्थित राहता येईल. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, मनोरंजनासह इतर कार्यक्रमावर बंदी असेल. सरकारी आणि खासगी ऑफिस बंद राहतील. कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची सुविधा असेल. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येईल.

सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स, बँक्वेंट हॉल, ऑडिटोरिएम बंद राहतील. सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, वेलनेस क्लिनिक, जीम, योगा इन्स्टिट्यूट, इंटरटेनमेंट पार्क, अम्यूजमेंट पार्क, वॉटर पार्कसह अन्य ठिकाणे बंद असतील. रेस्टॉरंटही बंद ठेवण्यात येतील.

केवळ होम डिलिवरी आणि टेक अवे काऊंटर्स सुरु राहतील. बार बंद राहतील. हॉटेल काही अटीशर्थींवर सुरु ठेवण्यात येतील. आंतरराज्य बसेस ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. परंतु या बसमधून केवळ अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्यांनाच परवानगी असेल.

बसमध्ये कुठल्याही प्रवासाला उभं राहून प्रवास करता येणार नाही. माल वाहतूकीला कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसतील. यासाठी विशेष परवानगी अथवा ई पासची आवश्यकता भासणार नाही. परंतु कोविड लसीकरण झालेल्यांनाच वाहतूक करण्याची परवानगी आहे.