मोदींनी 'या' व्यक्तींवर सोपवलीय कोरोना लस भारतात आणण्याची जबाबदारी; पार पाडणार मोठी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 03:49 PM2020-06-26T15:49:58+5:302020-06-26T15:55:00+5:30

जगातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटींच्या आसपास पोहोचला आहे. तर भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा ५ लाखांच्या जवळ गेला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनावरील लसीसाठी जगभर संशोधन सुरू आहे.

जगात सध्याच्या घडीला १२५ हून अधिक लसींवर काम सुरू आहे. कोरोनावरील या लसी सध्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. कोरोना लस निर्मितीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये भारताला महत्त्वाचं स्थान आहे.

भारतामध्येही तीन-चार लसींवर संशोधन सुरू आहे. मात्र यातील एकही प्रयत्न यशस्वी न ठरल्यास भारताला कोरोना लस मिळावी याचीही जोरदार तयारी सुरू आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी तीन खास व्यक्तींवर सोपवण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजयराघवन आणि जैव तंत्रज्ञान विभाग या दिशेनं काम करत आहे.

भारतात कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. मात्र त्यात अपयश आल्यास फारसं नुकसान होणार नाही. कारण त्या लसीच्या वितरणात भारताची भूमिका महत्त्वाची असेल, असा ठाम विश्वास विजयराघवन यांनी व्यक्त केला.

मोठ्या प्रमाणात लसीचं उत्पादन करण्याची भारताची क्षमता आहे. त्यासाठी भारत जगात ओळखला जातो. त्यामुळे भारताला नजरेआड करून चालणार नाही, असंदेखील विजयराघवन म्हणाले.

परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला त्यांचे अमेरिकेतील समकक्ष स्टिव बिजन यांच्या संपर्कात आहेत. याशिवाय ते जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियातल्या अधिकाऱ्यांशीदेखील सातत्यानं संवाद साधत आहेत.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे अतिशय महत्त्वाच्या देशांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी आहे. ते अमेरिका, इस्रायलमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. याशिवाय ब्राझील, दक्षिण कोरियामधील अधिकारीदेखील जयशंकर यांच्या संपर्कात आहेत.

सध्याच्या घडीला जगात १२५ हून कोरोना लसींवर संशोधन सुरू असल्याची माहिती पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार असलेल्या विजयराघवन यांनी दिली. १२५ पैकी १० लसी संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात आहेत. ८ लसींच्या दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या (प्राणी आणि मानवी) सुरू आहेत, असं त्यांनी सांगितली.

सध्या केवळ दोन लसी तिसऱ्या टप्प्यात (मोठ्या प्रमाणात मानवी चाचण्या) आहेत. पुढील काही महिन्यांत त्यांचे निष्कर्ष हाती येतील, अशी माहिती विजयराघवन यांनी दिली.

जगात प्रथमच एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लसींवर काम सुरू आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जगातील सर्वात मोठी लस उत्पादन संस्था आहे. त्यामुळे कोरोनावर जगात कुठेही लस तयार करण्यात आल्यास त्याचं प्रचंड प्रमाणात उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये होईल.

Read in English