coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 07:05 AM 2020-07-22T07:05:35+5:30 2020-07-22T07:12:22+5:30
लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी मलकानगिरी येथे जे काही करण्यात आले ते वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कोरोना विषाणूच्या संपूर्ण देशभरात झालेल्या फैलावामुळे सध्या सर्वत्र भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.
दरम्यान, लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी मलकानगिरी येथे जे काही करण्यात आले ते वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
ओदिशामधील मलकानगिरी येथे १० ते १२ वर्षांखालील लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी देशी दारू पाजण्यात आली. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मलकानगिरी येथे १० ते १२ वर्षांखालील ५० हून अधिक मुलांना काही स्थानिकांनी कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सालपा नावाची देशी दारू पाजली. ही देशी दारू पिल्याने लहान मुलांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवता येईल, असा येथील खेडूतांचा विश्वास आहे.
ही घटना मलकानगिरी जिल्ह्यातील पडिया ब्लॉकमधील परसनपाली गावात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये सुमारे ५० हून अधिक मुलांना देशी दारू पाजली जात असल्याचे दिसत आहे. मात्र या दरम्यान या मुलांमध्ये तसेच स्थानिक लोकांमध्येही सोशल डिस्टंसिंग नव्हते. तसेच यांच्यापैकी कुणीही मास्कही परिधान केलेला नव्हता.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अल्कोहोलचे सेवन केल्याने कोरोना बरा होईल असे मानणे चुकीचे आहे, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. अरिजित महापात्रा यांनी दिली आहे.
मद्यप्राशन करणे हा कोरोनाला बरा करण्याचा उपाय असू शकत नाही. कारण कोरोना हा तुमच्या जीआय ट्र्रॅकमधून जात नाही तर तो डोळे, नाक आणि तोंडातून शरीरात प्रवेश करतो. जर तुम्ही कोरोनाबाधिताकडून काही घेत असाल तर तुमच्या श्वसन मार्गातून कोरोना शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे दारू ही कोरोनापासून बचाव करण्याचा किंवा उपाय करण्याचा मार्ग असू शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.