coronavirus:...म्हणून मुंबईत कोरोना घटला आणि दिल्लीत वाढला, तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण By बाळकृष्ण परब | Published: November 20, 2020 10:06 AM 2020-11-20T10:06:42+5:30 2020-11-20T10:21:24+5:30
coronavirus News : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीतील शासन आणि प्रशासनासमोर गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती ही कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातील परिस्थितीप्रमाणे आहे. आता एकीकडे मुंबईत कोरोना नियंत्रणात आलाय. तर दिल्लीत अजूनही स्थिती बिकट आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. वाढत्या प्रदूषणाबरोबरच कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीतील शासन आणि प्रशासनासमोर गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती ही कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातील परिस्थितीप्रमाणे आहे. आता एकीकडे मुंबईत कोरोना नियंत्रणात आलाय. तर दिल्लीत अजूनही स्थिती बिकट आहे. याची काही कारणे समोर आली आहेत.
२५ जून रोजी दिल्लीने कोरोनाच्या रुग्णसंख्येच्याबाबतीत मुंबईला मागे टाकले होते. तेव्हापासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास नियंत्रणात आहे. तर दिल्लीत सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबई जवळपास पाच महिने कोरोनाचा हॉटस्पॉट राहिली. मात्र धारावीसारख्या भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यापासून आता संपूर्ण मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे.
दुसरीकडे दिल्लीत अजूनही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला नियंत्रित करण्याच्या पद्धतीबाबत तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हल्लीच पार्शियल लॉकडाऊनचा सल्ला दिला आहे.
मुंबईत सध्या कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ११ हजार आहे. तर दिल्लीमध्ये हीच संख्या सुमारे ४२ हजार आहे. मात्र मुंबईमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दिल्लीच्या तुलनेत सुमारे ३ हजारांहून अधिक आहे.
तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्र सरकारने सणावारांच्या दिवसांत लॉकडाऊनमध्ये कुठल्याही प्रकारची सवलत दिली नाही. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली नाही. विरोधी पक्षाच्या दबावानंतरही राज्यात शाळा, धार्मिक स्थळे, मॉल, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट आणि लोकल ट्रेन सुरू करण्याची परवानगी देण्यात कुठलीही घाईगडबड केली नाही. त्याऐवजी सरकारने लॉकडाऊनची नियमावली जारी केली. समारंभांवर निर्बंध लादले. अगदी गणेशोत्सवासारखा सणही मुंबईत साधेपणात साजरा झाला. दिवाळीवरही निर्बंध होते. तसेच छठपूजेवरही निर्बंध लागू केले.
दिल्लीचा विचार केल्यास येथे सरकारने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये लवकर सूट दिली. बाजार, मद्याच्या दुकानांवरील निर्बंध हटवणारे दिल्ली पहिले शहर होते. कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेल्या वाढीसाठी सणावारांच्या दिवसांत झालेली गर्दी कारणीभूत आहे.
कोरोनाच्या संसर्गामध्ये तपाससुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतो. कोरोना ही आपल्यासमोरील गंभीर समस्या आहे याची जाणीव मुंबईला सुरुवातीलाच झाली. झोपडपट्टीमध्ये कोरोनाला रोखणे सोपे नव्हते. महाराष्ट्र सरकारने तपासण्यांवर लक्ष ठेवले. दरम्यान, दिल्ली सरकारच्या डेटामधून समजले की, दिल्लीने मुंबईच्या तुलनेत तीन पट अधिक चाचण्यांचे परीक्षण केले.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार दिल्लीमध्ये रॅपिड अँटिजन टेस्टची संख्या अधिक आहे. दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या दोन तृतियांश चाचण्या ह्या अँटिजन होत्या, असे रिपोर्टमधून स्पष्ट होते. अँटिजन चाचण्या ह्या आरटी-पीसीआरच्या तुलनेत कमी विश्वसनीय मानल्या जातात.
कोरोनाचे संकट वाढताच मुंबईमधील वरळी, बीकेसी, गोरेगाव आणि दहिसर येथे मेगा कोविड रुग्णालये सुरू करण्यात आली. गंभीर रुग्णांसाठी वेगळी रुग्णालये उभी करण्यात आली. येथील बेड्सची एकूण संख्या ही १७ हजार ४६७ एवढी होती. त्यातील १२ हजार ३२९ बेड उपलब्ध आहेत. मुंबईतील सरकारी आणि खासगी मिळून एकूण बेड १४ हजार ४६२ आहेत. ज्यामधील ९ हजार ७३४ बेड उपलब्ध आहेत.
दुसरीकडे दिल्लीमध्ये राष्ट्रीय राजधानी म्हणून केंद्र आणि दिल्ली सरकार अशा दोघांकडूनही आरोग्य आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. तरीही दिल्लीमध्ये पुरेसे आयसीयू बेड्स उपलब्ध नाहीत. मुंबईच्या तुलनेत दिल्लीमध्ये विशेष कोविड रुग्णालये तयार करण्यात आली नाहीत.